ऑनलाइन पद्धतीने तब्बल ११ हजार ७४ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेल्या पोलीस शिपायांच्या ३३० जागांसाठी शुक्रवारी भरतीला सुरवात झाली. पदांच्या तुलनेने उमेदवारांची संख्या कित्येकपट असल्याने या स्पर्धात्मकतेत बाजी मारण्यासाठी उमेदवारांकडून उन्हाच्या झळा अंगावर झेलत विविध कसोटय़ांतून अग्रक्रमाने यशस्वी होण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू होते. भरती प्रक्रियेतील पक्षपातीपणा टाळण्यासाठी प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येत असल्याने यामध्ये पारदर्शकता असण्याची शक्यता जाणवत आहे. मोठय़ा प्रमाणात अर्ज आल्याने दररोज १५०० उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे ३३० पदांसाठी होणाऱ्या भरतीकरिता जिल्हा पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह २०० कर्मचारी कार्यरत झाले आहेत.
राज्यातील पोलीस दलामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता मोठय़ा प्रमाणात आहे. शांतता सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाल्यानंतर राज्य शासनाकडून व पोलीस प्रशासनाकडून पोलिसांच्या कमतरतेचे कारण पुढे केले जाते. मात्र यावर सातत्याने टीका होऊ लागल्याने गृह विभागाने आस्थापनेमध्ये मोठय़ा प्रमाणात पोलीस शिपाई पदाची भरती करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शुक्रवारी पोलीस शिपायांच्या ३३० जागांसाठी जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या पोलीस कवायत मैदानावर भरतीला सुरुवात झाली. सकाळी ६ वाजल्यापासून मैदानावर कागदपत्रांची पडताळणी सुरू करून भरतीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उमेदवारांची वजन, छाती, उंची घेण्यास सुरुवात झाली. वजन उंचीची चाळणी पार केल्यानंतर उमेदवारांची १०० मीटर धावणे, लांब उडी, गोळा फेक, पुलअप्स आदी क्रीडाप्रकरांच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. भरतीचे चित्रीकरण करण्यात येत असून उमेदवारांच्या समोर त्यांचे प्राप्त गुण दाखवण्यात येत आहेत. अशा प्रकारे भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येत आहे.
पोलिस अधीक्षक डॉ.मनोजकुमार शर्मा, अपर पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक एम.एम मकानदार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक एस.चैतन्या, गृह पोलीस उपाधिक्षक किसन गवळी, शाहुवाडी पोलीस अधीक्षक वैशाली माने यांच्यासह १४ पोलीस निरीक्षक, ३५ पोलीस उपाधीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व १५० कर्मचारी भरती प्रक्रियेत सहभागी झाले आहेत.
पोलिस भरतीसाठी ११ हजार उमेदवारांचे अर्ज
ऑनलाइन पद्धतीने तब्बल ११ हजार ७४ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेल्या पोलीस शिपायांच्या ३३० जागांसाठी शुक्रवारी भरतीला सुरवात झाली.
आणखी वाचा
First published on: 07-06-2014 at 03:51 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11 thousand nominations for police recruitment