चंद्रपूर जिल्ह्य़ात महाराष्ट्रात सर्वाधिक ११० पट्टेदार वाघांची नोंद घेण्यात आली असून ‘ब्लॅक गोल्ड सिटी’ अशी ओळख असलेल्या चंद्रपूरची ‘दि लॅन्ड ऑफ टायगर’ ही नवीन ओळख झाली आहे. हमखास व्याघ्र दर्शनाच्या हमीमुळे देशविदेशातील व्याघ्र अभ्यासक या जिल्ह्य़ाकडे आकर्षित होत आहेत.
चंद्रपूर जिल्हा म्हटले की, प्रचंड औद्योगिकीकरण, देशातील चौथ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर व प्रचंड उष्णतामान यामुळे सर्वदूर बदनाम झालेले नाव आहे. त्यामुळे या जिल्ह्य़ात भटकंतीसाठी येणाऱ्या पाहुण्यांची संख्या खूप कमी आहे, परंतु औद्योगिकीकरण, प्रदूषण व उष्णता या तिन्ही आघाडय़ांवर मात करून वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे काळ्या सोन्याचे शहर ही जुनी ओळख पुसून काढत महाराष्ट्रात सर्वाधिक ११० पट्टेदार वाघांची नोंद या जिल्ह्य़ात घेण्यात आल्याने आता चंद्रपूरला ‘दि लॅन्ड ऑफ टायगर’ ही नवीन ओळख मिळाली आहे. वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासह एकूण ११० वाघांचे अस्तिव या जिल्ह्य़ात असल्याची माहिती येथील मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.