अहिल्यानगरः जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या क्षयरोग रुग्ण तपासणी मोहिमेत आत्तापर्यंत ११२३ क्षयरुग्ण आढळले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (पालिका हद्दीसह) ९९३ तर अहिल्यानगर शहरात, महापालिका हद्दीत १३० रुग्ण आढळले आहेत. अहिल्यानगर शहर व तालुका, संगमनेर, राहता येथे क्षयरुग्णांचे प्रमाण अधिक आढळले आहे.
जिल्हा आरोग्य विभागाकडून ही माहिती उपलब्ध झाली. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ७ डिसेंबरपासून १०० दिवसीय क्षयरुग्ण शोध मोहीम राबवली जात आहे. ती जागतिक क्षयरोग दिनापर्यंत, २४ मार्चपर्यंत राबवली जाईल. जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे, क्षयरुग्णांचा मृत्यू दर कमी करणे, नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे, वंचित व जोखमीच्या घटकांपर्यंत पोहोचून आरोग्यसेवा पुरवणे क्षयरोगविषयी जनजागृती करणे, समाजातील क्षयरोगविषयी सामाजिक कलंक कमी करण्यासाठी उपक्रम राबवणे, क्षयरुग्णांना पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत निक्षयमित्रकडून पोषण आहार कीटचे वाटप करणे असा कार्यक्रम १०० दिवसात राबवला जाईल. याअंतर्गत सन २०२५ पर्यंत जिल्हा क्षयमुक्त करण्याचे आरोग्य विभागाचे प्रयत्न असल्याची माहिती क्षयरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत जायभाय यांनी दिली.
या मोहिमेपूर्वी गेल्या वर्षभरात झालेल्या तपासणीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ४८०० तर शहरात महापालिका हद्दीत ७४७ असे एकूण ५५४७ रुग्ण आढळले. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात दोन महिन्यातच ११२३ रुग्ण आढळले आहेत. हे प्रमाण अधिक असल्याचे मत डॉक्टरांकडून व्यक्त केले जात आहे.
क्षयरुग्णांवर आरोग्य विभागाकडून मोफत तपासणी व उपचार केले जातात. महापालिकेने नवीपेठेतील आरोग्य केंद्रात स्वतंत्र क्षयरोग विभाग सुरू केलेला आहे. या रुग्णांना दरमहा १००० रुपये, सहा महिन्यांपर्यंत उपचारासाठी दिले जातात. रुग्ण निष्पन्न झाल्यानंतर ३ हजार रुपये व उपचारासाठी ३ हजार रुपये उपलब्ध केले जात असल्याची माहिती डॉ. शकील शेख यांनी दिली.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
दोन महिन्यात ग्रामीण भागात आढळलेले तालुकानिहाय क्षयरुग्ण संख्या पुढीलप्रमाणे- अहिल्यानगर शहर १३० व तालुका १००, अकोले ५२, जामखेड ४५, कर्जत ६७, कोपरगाव ६९, नेवासा ६६, पारनेर ४५, पाथर्डी ४८, राहता १०९, राहुरी ५७, संगमनेर १२८, शेवगाव ७९, श्रीगोंदे ७६ व श्रीरामपूर ५२.
अहिल्यानगर जिल्हा निवडीचे कारण
१०० दिवसीय क्षयरोग शोध मोहीम देशातील ३४७ निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचाही समावेश आहे. १०० दिवस शोध मोहिमेत जोखीमग्रस्त भाग निवडून त्याचे सर्वेक्षण करण्यात येते. निक्षय शिबिर, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, उद्योग संस्था, निवासी शाळा, कारागृह येथे रोग तपासणी शिबिर व स्थलांतरित, ऊस तोडणी कामगार, उच्च जोखीमग्रस्त भाग व वंचित घटक यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. क्षयरुग्णांचा मृत्यू दर ३.६ टक्केपेक्षा जास्त व रुग्ण शोधण्याचा दर १७०० प्रति लक्ष लोकसंख्या यासह इतर निकषावर अहिल्यानगर जिल्हा सर्वेक्षणासाठी निवडण्यात आला आहे.
क्षयरोगाची लक्षणे
दोन आठवड्यांपासून सुरू असलेला खोकला, खोकल्यातून पडणारे रक्त, ताप, वजन कमी होणे, भूक मंदावणे, प्रतिकारशक्ती कमी होणे.-डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्याधिकारी.