सोलापूर : एकीकडे कांदा निर्यातबंदी, अवकाळी पाऊस, दुष्काळ अशा कारणांमुळे कांद्याला अपेक्षित भाव मिळाला नसताना सुध्दा सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात ८० लाख ५७५३ क्विंटल कांद्याची उच्चांकी आवक होऊन त्यात ११३९ कोटी ३० लाख ८३ हजार ८०० रूपये एवढी विक्रमी उलाढाल झाली. मात्र याच काळात कांदा निर्यातबंदीचा फटका बसून शेतकऱ्यांना सुमारे ४०० कोटींवर पाणी सोडावे लागल्याचे दिसून आले.
सोलापुरात दरवर्षी ऑक्टोबरमध्ये कांदा हंगामाला सुरूवात होते. कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये सुरूवातीला शेजारच्या कर्नाटकातून कांदा दाखल होतो आणि महिनाभर म्हणजे नोव्हेंबरपर्यंत कर्नाटकातील कांदा भाव खाऊन जातो. त्या कालावधीत प्रतिटन तीन हजार ते साडेतीन हजार क्विंटलपर्यंत कांद्याला भाव मिळतो.
कर्नाटकाच्या तुलनेत महाराष्ट्रातील कांदा उशिरा, नोव्हेंबरनंतर दाखल होतो. तोपर्यंत कर्नाटक आणि महाराष्ट्रातून आवक वाढल्यामुळे साहजिकच कांद्याचा भाव गडगडतो आणि दीड हजार ते दोन हजार रूपयांपर्यंत कांद्याचा दर कोसळतो, असा अनुभव आहे. त्याचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. यातच गत वर्षी मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे कांदा दराच्या घसरणीत आणखी भर पडली. कांदा निर्यातबंदीमुळे सोलापुरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे चारशे कोटींचे उत्पन्न बुडाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
तथापि, अवकाळी पाऊस, दुष्काळ, कांदा निर्यातबंदी अशा संकटातही सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आर्थिक वर्षात कांद्याची उच्चांकी आवक होऊन तेवढीच मोठी आर्थिक उलाढाल झाली. मागील २०२२-२३ आर्थिक वर्षात ७७ लाख ८४ हजार २४२ क्विंटल कांद्याची आवक होऊन ७२६ कोटी ६२ लाख ६८ हजार ३०० रूपयांची उलाढाल झाली होती आणि त्यातून बाजार समितीला सात कोटी ३४ लाख ५२४४ रूपयांचे बाजार शुल्क (सेस) मिळाले होते.
त्यातुलनेत मार्चअखेर सरलेल्या आर्थिक वर्षात आर्थिक उलाढाल ४१३ कोटींनी वाढून ११३९ कोटी ३१ लाख रूपयांत गेली आहे. तर बाजार समितीला या कांदा व्यवहारातून बाजार समितीला १२ कोटी ५२ लाख ८३ हजार ७२० रूपये एवढे बाजार शुल्क (सेस) मिळाले आहे. बाजार समितीची कांद्यासह एकूण वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे १८०० कोटींची आहे. त्यापैकी बहुतांश उलाढाल कांद्याची होते.
कांदा बाजारासाठी प्रसिध्द असलेल्या नाशिक जिल्ह्यात एकीकडे हमाल, मापाडी आणि व्यापा-यांच्या वादातून गेले १२ दिवस कांदा लिलाव ठप्प झाला असताना असलेल्या नाशिक जिल्ह्यात एकीकडे हमाल, मापाडी आणि व्यापाऱ्यांच्या वादामुळे गेले १२ दिवस कांदा बाजार बंद आहे. इकडे सोलापुरात कांदा बाजार सुरळीत असून नगर जिल्ह्यातून दररोज सरासरी दोनशे टन कांदा सोलापुरात नियमितपणे दाखल होत आहे.