दापोली : या मोसमातील दापोली तालुक्यात कासवांचे घरटे करण्याचा पहिला मान आंजर्ले गावाने पटकावला आहे. आंजर्ले समुद्रकिनारी या हंगामातील पहिल्याच घरट्यात तब्बल ११८ अंडी सापडून आली. यामुळे कासवप्रेमींमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.
यंदा भरपूर पाऊस झाला. यामुळे पावसाचा कालावधी देखील लांबला. याचा परिणाम थंडीवर होऊन थंडीचा हंगाम देखील लांबणीवर पडला. यामुळे यावर्षी कासवांच्या अंडी घालण्याच्या कालावधीत देखील कमालीचा बदल झाल्याचे आढळून येत आहे. या हंगामातील पहिले कासवाचे घरटे दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे झाले आहे. कासवाच्या मादीने समुद आंजर्ले समुद्रकिनारी या हंगामातील पहिल्याच घरट्यात तब्बल ११८ अंडी दिली. ही अंडी आंजर्ले येथील कासव प्रेमी प्रथमेश केळसकर, अजिंक्य केळसकर, सुजन खेडेकर यांच्या मदतीने वनविभागाने संरक्षित केलेली आहेत.
आणखी वाचा-एसटी बसमध्ये प्रवासात अश्लील चित्रफीत दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
दापोली तालुक्यात यापूर्वी कासवाच्या मादीने अंडी दिल्यावर ती वन्यजीवांकडून फस्त करण्यात येत होती. काही अंडी स्थानिक गावकरी खाण्यासाठी नेत असत. यामुळे कासवांची संख्या रोडावली होती. मात्र सह्याद्री निसर्ग मित्रने वनविभागाच्या व स्थानिकांच्या मदतीने मोठी चळवळ उभी केली. याचा सकारात्मक परिणाम होऊन आता समुद्रकिनारी सापडून येणारी अंडी पूर्णपणे संरक्षित करण्यात येतात. यातून बाहेर येणारी पिल्ले पुन्हा समुद्रात सोडण्यात येतात. हा सोहळा पहाण्याकरिता पर्यटक दापोलीत मोठ्या प्रमाणात येतात. यामुळे दापोलीच्या अर्थकारणाला मोठ्या प्रमाणात चालना मिळते.