जुन्या रेल्वेस्थानकावर रेल्वे आरक्षणाची सुविधा रेल्वे प्रशासनाने सकाळी ८ ते रात्री ८ अशी १२ तास सुरू केल्यानंतर श्रेय लाटण्याची स्पर्धा तीव्र झाली असून आमच्या आरवण्याने सूर्य उगवल्याचे पत्रक अनेक जणांनी प्रसिद्धीस दिले आहे.
खासदार  डॉ. सुनील गायकवाड यांनी पाठविलेल्या प्रसिद्धिपत्रकात मागील दोन वर्षांपूर्वी १२ तास आरक्षणाची सुविधा उपलब्ध होती. मधल्या कालावधीत ती सकाळी ८ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते ८ अशा वेळेत सुरू होती. १२ ते ४ या कालावधीत आरक्षण खिडकी बंद राहात असे. त्यामुळे नागरिकांची गरसोय होत होती. रेल्वे अधिकाऱ्यांना पूर्ववत १२ तास आरक्षण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर २२ मेपासून ही सुविधा सुरू झाली असून गायकवाड यांनी घेतलेल्या निर्णयाचे लातुरात स्वागत होत असल्याचे म्हटले आहे.
लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्या कार्यालयामार्फत पाठवलेल्या प्रसिद्धिपत्रकात या मागणीसाठी रेल्वे प्रशासन व विभागीय रेल्वे व्यवस्थापन यांच्या कार्यालयाकडे पाठपुरावा करून ही मागणी मान्य करून घेतल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष संजय निलेगावकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
ग्राहक पंचायत लातूरच्या कार्यालयातर्फे श्यामसुंदर मानधना यांनी पाठविलेल्या प्रसिद्धिपत्रकात ग्राहक पंचायतीतर्फे सोलापूर येथील रेल्वे विभागाचे प्रबंधक व मुंबई येथील रेल्वे विभागाचे व्यवस्थापक व रेल्वेमंत्र्यांकडे ग्राहकांच्या अडचणीसंबंधी पत्र पाठवून पाठपुरावा केला. रेल्वे विभागाने प्रवाशांची गरसोय दूर केल्याबद्दल या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Story img Loader