राष्ट्रवादी काँग्रेसने चाचपणीसाठी बोलावलेल्या सभेस ३२ पैकी केवळ २० सदस्य उपस्थित राहिल्याने पक्षाचा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरील दावा धोक्यात आल्याचे मानले जाते. अध्यक्षपदासाठी मंजूषा राजेंद्र गुंड, योगिता शिवशंकर राजळे, अश्विनी युवराज भालदंड, कालिंदी माधवराव लामखडे, जयश्री कुंडलिक दरेकर अशा पाच जणी इच्छुक असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.
दरम्यान, पक्षाचा अध्यक्षपदावरील दावा धोक्यात आल्याचा पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे यांनी इन्कार केला. काही सदस्य बैठकीला वेळेत पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे ते अनुपस्थित होते, असे समर्थन त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
काँग्रेसबरोबर आघाडी करून जि.प.तील सत्ता ताब्यात घेण्यासाठी, जास्त संख्याबळाच्या आधारावर अध्यक्षपदावर दावा करण्यासाठी, अध्यक्षपदाच्या चाचपणीसाठी राष्ट्रवादीने आज, मंगळवारी दुपारी पक्ष कार्यालयात बैठक घेतली. पक्षाचे जि.प.तील संख्याबळ ३२ आहे. बैठकीला २० सदस्यच उपस्थित राहिले. काँग्रेसचे संख्याबळ २८ आहे. अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव आहे. बैठकीला आमदार अरुण जगताप, जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, जि.प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, नगरचे महापौर संग्राम जगताप, उपाध्यक्ष मोनिका राजळे, गटनेते शरद नवले, सोमनाथ धूत, माजी जिल्हाध्यक्ष दादा कळमकर तसेच तालुकाध्यक्ष उपस्थित होते.
बैठकीची माहिती नंतर काकडे यांनी दिली. काँग्रेसच्या पदाबाबतच्या अवास्तव मागण्या होत्या, त्यामुळे त्यांच्याबरोबर आघाडी होऊ शकली नाही. आता बदलत्या परिस्थितीमुळे काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा व भाजप-शिवसेनेबरोबरची युती संपुष्टात आणण्याचा निर्णय झाल्याची माहिती त्यांनी दिली. आघाडी करताना शालिनीताई विखे यांच्या काळात जी पदे त्यांच्याकडे होती, ती आता आमच्याकडे व त्यांनी इतरांना दिलेली पदे काँग्रेसला मिळतील, असे वाटप ठरल्याचे काकडे म्हणाले.
राष्ट्रवादीचा अध्यक्षपदाचा उमेदवार पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसार जाहीर केला जाईल. इतर दोन समित्यांवरील नियुक्त्या पालकमंत्री ठरवतील. दि. २० रोजी दोन्ही काँग्रेसची एकत्रित बैठक पालकमंत्री, काँग्रेसचे दोन्ही मंत्री यांच्या उपस्थितीत हुंडेकरी लॉन्सवर होईल. तेथेच उमेदवार जाहीर केला जाईल. अध्यक्षपदासाठी वरील पाच उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज केले आहेत. आघाडी झाल्याचे केवळ राष्ट्रवादी जाहीर करत आहे, काँग्रेसने अद्याप भूमिका जाहीर केली नाही, याकडे लक्ष वेधले असता, मुंबईत काँग्रेसच्या मंत्र्यांबरोबर बैठक झाल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसबरोबरच्या वादाच्या जुन्या खपल्या आता काढू नयेत असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
‘फाळके राजीनामा मागे घेतील’
पक्षाचे तब्बल १३ सदस्य बैठकीला अनुपस्थित राहिले. पाथर्डीतील ढाकणे गटाच्या उज्ज्वला गहिनीनाथ शिरसाठ (भाजप) उपस्थित राहिल्याने ही संख्या २० वर पोहोचली. बैठकीला कोण अनुपस्थित आहे, याचीच अधिक उत्सुकता व्यक्त होत होती. राष्ट्रवादीला पाठिंबा दिलेल्या अपक्ष विश्वनाथ कोरडे यांनीही आपल्याला राष्ट्रवादीने गृहीत धरू नये असे सांगितले आहे. पक्षाचे राजीनामा दिलेले सदस्य राजेंद्र फाळके यांची समजूत काढली जाईल, ते पेल्यातील वादळ ठरेल, असे अंकुश काकडे म्हणाले.
प्रतिभा पाचपुते यांनाही व्हीप!
अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सदस्यांना व्हीप बजावला जाणार आहे. पक्षाने आयुक्तांकडे गटनोंदणी केली आहे. माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी गटनोंदणीत असल्याने त्यांनाही व्हीप बजावला जाईल. त्यांनी विरोधात मतदान केले तर त्यांचे पद रद्द करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली जाईल, असे सांगताना अंकुश काकडे यांनी श्रीगोंद्यात राष्ट्रवादीकडे सभापतिपद आले हा शुभशकुन असल्याचा दावा केला. पुढील काळात नेता कितीही मोठा असला तरी पक्षातील बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा