कराड : कराड शहर परिसर व ओगलेवाडीमध्ये सहा दिवसांपूर्वी पोलिसांनी मेफेड्रोन (एमडी ड्रग्ज) विक्रीचा पर्दाफाश केला. मेफेड्रोनच्या १० ग्रॅम साठ्यासह तिघांना पकडले. अधिक तपासात या अमली पदार्थाचे धागेदोरे सुरुवातीला मुंबईतून निघत आता दोन परदेशी व्यक्तींसह १२ जणांचा यात समावेश उघड झाला आहे. या सर्वांना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी सुरुवातीला राहुल अरुण बडे (३७, रा. पाण्याच्या टाकीजवळ, सोमवार पेठ, कराड), समीर उर्फ सॅम जावेद शेख (२४, रा. आदर्श कॉलनी, कार्वे नाका, कराड), तौसीब चाँदसो बारगिर (२७, रा. कार्वेनाका, कराड) या तिघांना अटक केली.
यानंतर पोलिसांची तीन पथके तपासासाठी मुंबईसह अन्यत्र गेली होती. या पथकांनी मुंबईतून पाच, तर कराडमधून आणखी चौघे अशा नऊ जणांना अटक केली. मुंबईतून दोन परदेशी व्यक्तींना अटक केल्याने हे परदेशी रॅकेट असण्याची आणि या प्रकरणात आणखी काहीजण गजाआड होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सुरुवातीला १० ग्रॅम आणि नंतर २० ग्रॅम असे एकूण ३० ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत केल्याने खळबळ उडाली आहे.
अमित अशोक घरत (३१, रा. करांजडे ता. पनवेल जि. रायगड), दीपक सुभाष सूर्यवंशी (४३ रा. चाळीसगाव जि जळगाव, सध्या तुर्भे- मुंबई), बेंजामिन ॲना कोरू (४४, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई), रोहित प्रफुल्ल शहा (३१, रा. शनिवार पेठ, माळी कॉलनी, कराड), सागना इ मॅन्युअल (३९, घणसोली, नवी मुंबई), नयन दिलीप मागाडे (२८, रा. डोंबिवली पूर्व, जि. ठाणे), प्रसाद सुनील देवरुखकर (३०, पावस्कर गल्ली, कराड), संतोष अशोक दोडमणी (२२, सैदापूर, ता. कराड), फैज दिलावर मोमीन (२६, रा. मार्केट यार्ड, कराड) अशा अटक केलेल्या सर्वांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. यापूर्वी तिघांना पोलिसांनी अटक केल्याने संशयितांची संख्या बारावर पोहचली असून, हे सर्व पोलीस कोठडीत आहेत.