लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये टॉवेल निर्मिती करणा-या एका कारखान्याला अचानकपणे आग लागून त्यात १२ रॅपियर्स यंत्रमाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात लाखोंची हानी झाली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली.
बुधवारी एमआयडी भागातील कारखान्यांना साप्ताहिक सुट्टी असते. सुट्टीच्या दिवशी विद्युत पुरवठाही दिवसभर खंडित होतो. त्यानुसार काशीनाथ गड्डम यांच्या मालकीचा टॉवेल निर्मितीचा कारखानाही बंद होता. तथापि, दुपारी बाराच्या सुमारास अचानकपणे या बंद कारखान्याला आग लागली आणि काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीची तेथील सुरक्षा रक्षकांकडून माहिती मिळताच कारखान्याचे मालक काशीनाथ व यल्लप्पा गड्डम कारखान्याकडे धावून आले. सोलापूर महापालिकेच्या अग्निशामक दलाची यंत्रणाही तात्काळ धावून आली.
आणखी वाचा-अकरावीत शिकणाऱ्या मुलीच्या आत्महत्येनंतर २४ तासांत त्याच शाळेतील मुलाने गळफास घेत संपवले जीवन
अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांच्या अधिपत्याखाली पाण्याचे बंब आणि रासायनिक द्रवपदार्थ वापरून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र कारखान्यातील बारा रॅपियर्स यंत्रमाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडले कच्चा व काही कच्चा मालही जळून खाक झाला. बंद असलेला वीज पुरवठा पुन्हा सुरू होऊन त्यात विजेचे शॉर्टसर्किट झाल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती गड्डम यांनी दिली.