स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महायुतीतून राज्यामध्ये बारा जागा मिळाल्या पाहिजेत. अन्यथा स्वाभिमानी संघटना महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्र उमेदवार उभा करेल, असा इशारा संघटनेचे प्रदेश सचिव राजेंद्र गडय़ान्नावार यांनी दिला. जिल्ह्यातील कागल, चंदगड, राधानगरी, भुदरगड व शिरोळ या चार जागांवर संघटनेने दावा केला.
मुरगूड (ता. कागल) येथे आयोजित मेळाव्यात गडय़ान्नावार प्रमुख म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बंडू पाटील होते. कागल मतदारसंघातून संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. बाळासाहेब पाटील यांनी निवडणूक लढविण्याचे जाहीर केले.
खासदार राजू शेट्टी यांना कागलमध्ये पाय ठेवू देणार नाही, असे म्हणणाऱ्यांना जनताच धडा शिकवेल, असा उल्लेख करून गडय़ान्नावार यांनी विरोधी पक्षावर टीका केली. ते म्हणाले, कागल कुणाची जहागीरदारी नाही, राष्ट्रवादीने साखरसम्राटांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांची शत्रू आहे.
जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील म्हणाले, जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांत संघटनेने जोरदार तयारी केली आहे. मागील विधानसभेला राधानगरीमधून संघटनेला उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्याचा वचपा काढण्यासाठी कागलमधून संघटनेने संजय घाटगे यांना उमेदवारी दिली. त्यात फायदा कोणाचा आणि तोटा कोणाचा झाला हे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांनी ओळखून उमेदवारीबाबत योग्य निर्णय घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाध्यक्ष भगवान काटे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच स्वाभिमानी संघटनेचा एक नंबरचा शत्रू असल्याचे सांगून स्वार्थासाठी संघटना कधीच कोणाची मनधरणी करीत नाही. जर सन्मानपूर्वक तोडगा निघाला नाही, तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू. सागर कोंडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
‘स्वाभिमानी’स बारा जागा मिळाव्यात – गडय़ान्नावार
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महायुतीतून राज्यामध्ये बारा जागा मिळाल्या पाहिजेत. अन्यथा स्वाभिमानी संघटना महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्र उमेदवार उभा करेल, असा इशारा संघटनेचे प्रदेश सचिव राजेंद्र गडय़ान्नावार यांनी दिला.
First published on: 29-08-2014 at 02:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 seats for swabhimani