पालघर : जे. पी. इंटरनॅशनल शाळेच्या बसला सोमवारी दुपारी माहीम गावानजीक भीषण अपघात होऊन १२ विद्यार्थी जखमी झाले. ही बस केळवेहून पालघरकडे येत होती. बस माहीम गावातील पानेरी नदीजवळ येताच चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती वडाच्या झाडावर आदळली. शिशुवर्ग आणि पूर्व प्राथमिक वर्गातील १६ विद्यार्थी बसमध्ये होते. त्यापैकी १२ विद्यार्थी जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या सहा विद्यार्थ्यांना पालघर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर किरकोळ जखमी झालेल्या सहा विद्यार्थ्यांना पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बस भरधाव वेगात असताना बसचालक मोबाइलवर बोलत होता, असे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी न करणाऱ्या चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.