पिंपरी-चिंचवड येथील कणाद प्रशांत पिंपळनेरकर या १२ वर्षीय गतिमंद मुलाने महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर ‘कळसूबाई’ वर यशस्वी गिर्यारोहण करुन आपला १२ वा वाढदिवस साजरा केला. कणाद लहानपणापासून ‘सेरेब्रल पाल्सी’ या आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे विशेष मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी हे यश उत्साहवर्धक व प्रेरणादायक ठरणारं आहे.कणाद हा पिंपळनेरकर कुटुंबाचा एकुलता एक मुलगा आहे.
डॉक्टरांनी कणाद कधीही चालू शकणार नाही,असे त्याच्या आई वडिलांना सांगितले होते. त्याउलट कणादने आय्यप्पाच्या छोट्या टेकडीपासून पावलं टाकत प्रयत्नांची पराकाष्ठा करत, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाईवर यशस्वी गिर्यारोहण करुन कधीही खचू न जाण्याचा संदेश दिला आहे. कणाद पुणे येथील बालकल्याण संस्थेत वेगवेगळ्या गोष्टी शिकत आहे. गेल्या वर्षी ७ दिवसात ११ किल्ले सर केल्याचा विक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकोर्ड’ने नोंद घेतली आहे. यावर्षी नारायणगड, हडसर, चावंड हे तीन किल्ले आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर ‘कळसूबाई’ ही सलग चढाईची मोहिम दिनांक २३ ते २५ डिसेंबर २०१८ या कालावधीत आपल्या आई-वडिलांसोबत कणादने फत्ते केली.वडील प्रशांत पिंपळणेकर हे खासगी कंपनीत नोकरी असून आई दर्शना या गृहिणी आहेत.
कणादने २३ डिसेंबर रोजी तीन तासात नारायणगड आणि चार तासात हडसर या गिरिदुर्गांवर यशस्वी आरोहण केले. २४ डिसेंबर रोजी किल्ले चावंड या गिरिदुर्गाची चढाई चार तासात पूर्ण केली. २५ डिसेंबर रोजी वाढदिवसी सकाळी ९ वाजता कळसूबाई शिखराची चढाई सुरु केली. शिखरावर जाणार्या वाटेतल्या चार लोखंडी शिड्या हे कणादसाठी एक मोठेच आव्हान होते. मात्र न डगमगता, भीतीवर मात करत दुपारी २ वाजता कळसूबाई शिखरमाथा गाठला. वर पोहोचताच कणादने भगवा झेंडा आणि राष्ट्रध्वज फडकवून आपला आनंद व्यक्त केला. कळसूबाईचे दर्शन व आशिर्वाद घेऊन संध्याकाळी ७ वाजता पायथ्याला सुखरुप पोहोचून कणादने मोहिम पूर्ण केली.
या मोहिमेतील नारायणगड, हडसर आणि चावंड हे तिन्ही किल्ले गिर्यारोहणाच्या वाटांसाठी वेगवेगळी आहेत. त्यामुळे या तिन्ही किल्ले चढाईचा एकत्रित अनुभव लगेचच कळसूबाई शिखर चढण्यास कामी आला. आई दर्शना आणि वडील प्रशांत पिंपळनेरकर म्हणाले,की ‘निसर्गरम्य ठिकाणी, डोंगरी भागात वेगवेगळ्या वाटांवर भटकंती करताना कणादच्या नैसर्गिक क्षमताही वाढू लागल्या आहेत. यासाठी कुटुंबातील प्रत्येकाने दिलेल्या सहकार्य आणि प्रोत्साहनामुळेच हे शक्य झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.