कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने होणाऱ्या वारीच्या औचित्याने एस.टी. महामंडळाने यंदाच्या वर्षी १२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि कोकणातून जवळपास ७५० तर मराठवाड्यातून २२५ गाड्या सोडण्यात येणार आहेत. यंदाच्या वर्षी प्रवाशांच्या आरोग्याची देखील काळजी महामंडळाने केली असल्याची माहिती पंढरपूर येथील आगार व्यवस्थापक मुकुंद दळवे यांनी दिली आहे.
कार्तिकी एकादशी १९ नोव्हेंबर रोजी आहे. पंढरपूर आणि वारकरी संप्रदायातील प्रमुख आषाढी,कार्तिकी,चैत्री,माघी या चार यात्रांना महत्व आहे. यातील कार्तिकी वारीला मुंबई,कोकण, या ठिकाणांहून भाविक मोठ्या संख्येने येतात. आषाढी वारीच्या काळात कोकणात भात शेतीची कामे असतात. त्यामुळे इथला घरटी एक जण तरी न चुकता कार्तिकीला पंढरीला येतो. या भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. एस.टी.महामंडळाने कार्तिकी वारीसाठी राज्यातील भाविकांना सुखाचा प्रवास व्हावा याकरिता नियोजन करण्यात आले आहे. यासाठी पंढरपूर येथील नवीन व जुने बस स्थानकावरून वाहतूक होणार आहे.
यंदाच्या वर्षी मुंबई ,कोकण येथून जवळपास ७५० जादा बसेस सोडण्यात येणार आहे. तसेच नांदेड,परभणी,हिंगोली,बीड या स्थानकांमधून जवळपास २२५ जादा गाड्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर पुणे,अहमदनगर येथून १०० तर कोल्हापूर,सांगली येथून १२५ जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. याच बरोबरीने यंदाच्या वारीसाठी स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. पिण्याचे पाणी,तसेच बस स्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष मोहीम आखली आहे. तसेच साथीचे रोग पसरू नये म्हणून फवारणीही करण्यात येणार आहे. चंद्रभागा बस स्थानकावर गाड्या पार्किंग,कर्मचारी,वाहक,चालक यांच्या निवासाची सोय केली जाणार आहे.
वारीसाठींचा पोलीस बंदोबस्त
कार्तिकी यात्रेसाठी एक पोलीस अधीक्षक , ११ पोलीस उपअधीक्षक, १३४ पोलीस निरीक्षक , १२३६ पोलीस कर्मचारी , ७०० होमगार्ड याशिवाय बॉम्बशोधक पथक , विविध पोलीस निरिक्षक , वाहतूक कर्मचारी , महिला कर्मचारी असा बंदोबस्त नियुक्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.तसेच यात्रेच्या महत्त्वाच्या तीन दिवसासाठी मंदिर परिसरामधे व्हीआयपी वाहनांना मज्जाव करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.