वीस पटसंख्येपेक्षा कमी संख्या असणाऱ्या शाळा बंद करण्यात याव्यात असा शासनाने नियम काढला आहे. त्याचा फटका सावंतवाडी तालुक्यातील १२१ शाळांना बसणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. याबाबत योग्य तो तोडगा काढण्यात यावा. मुलांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी सदस्यांकडून करण्यात आली.
तालुक्यात कृषी विभागाकडून वाटप करण्यात आलेल्या मिर्चीच्या रोपात अपहार झाला आहे. कागदावर लाभार्थ्यांची नावे आहेत, मात्र प्रत्यक्षात त्यांना लाभ देण्यात आला नसल्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज सत्ताधारी गटाच्या प्रियांका गावडे आणि विरोधी गटाचे अशोक दळवी यांनी सभागृहात केली.
दरम्यान योग्य पद्धतीने तसेच मागणीनुसार लाभार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले आहे. नजर चुकीने काही नावे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे या प्रकाराची खात्री करू असे आश्वासन कृषी अधिकारी काका परब यांनी सभागृहात दिले. या वेळी ‘आत्मा’अंतर्गत तालुक्याला प्राप्त झालेला निधी अन्य ठिकाणी का वर्ग करण्यात आला याची चौकशी करा, अशी मागणी सभापती प्रमोद सावंत यांनी केली. ल्लसावंतवाडी पंचायत समितीची मासिक सभा आज सभापती प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विभागवार आढावा सुरू असताना कृषी विभागाकडून वाटप करण्यात आलेली मिर्चीची रोपे लाभधारकांच्या यादीत नाव असलेल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलीच नाहीत. त्यामुळे त्या लाभार्थ्यांकडून विचारणा केली जात आहे, असे माजी सभापती प्रियांका गावडे यांनी सभागृहाच्या नजरेस आणून दिले. या वेळी त्या ठिकाणी उत्तर देणाऱ्या कृषी अधिकारी परब यांनी विभागाकडून छोटय़ा-मोठय़ा लाभार्थ्यांनासुद्धा रोपे वापट करण्यात आली आहे, मात्र त्याची नोंद ठेवण्यात आली नाही, असे त्यांनी सांगितले. या वेळी दळवी व गावडे यांच्यासह अन्य सदस्यांनी या प्रक्रियेला आक्षेप नोंदवत या रोपांच्या वाटपात अपहार झाला आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली.
दरम्यान ‘आत्मा’अंतर्गत पाणलोट समित्यांकडे आलेला निधी अन्य ठिकाणी वर्ग करण्यात आल्याच्या कारणावरून पुन्हा एकदा परब यांना सभागृहाने टार्गेट केले. पाणलोट समित्यांच्या माध्यमातून अनेक कामे पूर्ण करण्यात आली आहेत, परंतु त्यांना निधीच उपलब्ध करून देण्यात आलेला नाही, त्यामुळे समित्यांचे प्रतिनिधी अडचणीत आहेत. त्यांनी तसे पंचायत समिती जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविले आहे. असे असताना त्यांचा निधी अन्य ठिकाणी वर्ग कसा काय झाला, याचे उत्तर सभागृहाला देण्यात यावे अशा सूचना सभापती सावंत यांनी दिल्या.
या वेळी सामाजिक वनीकरणाच्या अधिकाऱ्यांना सभागृहात टार्गेट केले. त्या ठिकाणी उपस्थित असलेले संबंधित खात्याचे लिपिक सुरेश आबदोडे यांनी अधिकारी पंचायत समितीच्या बैठकीला यायला मागत नाही. वारंवार सूचना करूनसुद्धा अन्य अधिकाऱ्यांना किंवा लिपिकाला पाठविले जाते त्यामुळे त्याच्या कामाबाबत आपल्याला माहिती नसते, असे सभागृहाला सांगून टाकले. या वेळी अशा प्रकारे खातेप्रमुख बैठकीला येण्यासाठी टाळाटाळ करीत असतील तर या प्रकाराची गंभीर दखल घेतली जाईल, असे सभापती सावंत यांनी सांगितले.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ करण्याबाबत योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी ग्रामस्थांतून भरपाईची मागणी होत आहे. त्यामुळे आपली जबाबदारी कृषी व महसूल विभागाने एकमेकांवर ढकलू नये, असे उपसभापती महेश सारंग यांनी सांगितले.