सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या आणि महाराष्ट्रातील प्रमुख मोठ्या धरणांपैकी एक समजल्या जाणाऱ्या उजनी धरणात १२३ टीएमसी इतका उच्चांकी पाणीसाठा झाल्यानंतर धरणातून भीमा नदीत पाणी सोडले जात आहे. धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात असून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग वाढवून दुपारी ४ वाजेनंतर २५ हजार क्युसेक इतका होता. याशिवाय धरणाच्या कालव्यांसह भीमा-सीना जोड बोगद्यातही पाणी सोडण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उजनी धरणात एकूण क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठा झाल्यानंतर प्रशासनाने धरणातून पाणी सोडण्यास उशीर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मूळ आराखड्याप्रमाणे धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता ११७ टीएमसी एवढी होती. त्यात वाढ होऊन एकूण १२३ टीएमसीपर्यंत पाणीसाठा जमा होऊ शकतो. त्यानुसार दुपारी चार वाजता धरणात १२२.४२ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. त्याचवेळी पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तेथील बंडगार्डन भागातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग नऊ हजार क्युसेकपर्यंत वाढला आहे. तर दौंड येथून थेट उजनी धरणात मिसळणा-या पाण्याचा विसर्ग वाढून १३ हजार ९३८ क्युसेक एवढा झाला होता. त्यामुळे तुडूंब भरलेल्या उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेल्या पाण्याचा विसर्ग २५ हजार क्युसेकवरून आणखी वाढविला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने उजनी धरणात वाढलेल्या पाणीपातळीचा विचार करून भीमा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तथापि, उजनी धरणात एरव्ही, शंभर टीएमसी पाणीसाठा झाल्यास आणि त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून भीमा नदीत पाणी सोडले जाते. मात्र यंदा १२३ टीएमसीपर्यंत म्हणजे पूर्ण क्षमतेपर्यंत पाणीसाठा झाल्यानंतरच धरणातून नदीत पाणी सोडण्यात आले आहे. पुण्यात सध्या प्रचंड प्रमाणात पडणारा पाऊस विचारात घेता उजनी धरणातील पाणीसाठ्यात पुन्हा तेवढीच वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे भीमा नदीत आणखी जादा पाणी सोडण्यासाठी धरणाचे आणखी जास्त दरवाजे उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी धरणातून सोडलेल्या पाण्याचा सदुपयोग करून जिल्ह्यातील सर्व तलाव, बंधारे भरून घेण्याचीही गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.