लातूर, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यांतील ६ विधानसभा मतदारसंघांचा मिळून झालेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील १ हजार ९७१पकी १३० मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. यातील ५ मतदान केंद्र अतिसंवेदनशील असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. या सर्व केंद्रांवर प्रशासन करडी नजर ठेवून आहे. या केंद्रांवर निर्धोक वातावरणात मतदान पार पडावे, या साठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
उस्मानाबाद मतदारसंघात औसा व निलंगा, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद व परंडा या ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. एकूण १७ लाख ७ हजार ६५९ मतदारांसाठी १ हजार ९७१ मतदान केंद्रे निर्माण केली आहेत. यातील १२५ केंद्रे संवेदनशील, तर ५ अतिसंवेदनशील आहेत. अतिसंवेदनशील असलेली सर्व मतदान केंद्रे बार्शीतील आहेत. सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांकडून तसा अहवाल प्राप्त झाल्याचे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी सांगितले.
उस्मानाबाद पोलीस अधीक्षकांनीही संवेदनशील केंद्रांचा अहवाल सादर केला. लातूर पोलीस विभागाचा अहवाल येणे बाकी आहे. तो प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकत्रित सर्व संवेदनशील मतदान केंद्रांचा आढावा घेतला जाईल, असेही डॉ. नारनवरे यांनी सांगितले.