लोकसत्ता प्रतिनिधी
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड पोलीस ठाणे हद्दीमध्ये भारतात अनधिकृतपणे प्रवेश करून राहणाऱ्या १३ बांग्लादेशी नागरिकांना रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने ६ महिन्यांची साधी कैदेसह प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य न्यायाधिश निखिल गोसावी यांनी हा निकाल दिला.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवादी विरोधी पथकाला दि. ११ नोव्हेंबर २०२४ रोजी पूर्णगड पोलीस ठाणे हद्दीत काही बांग्लादेशी नागरिक अनधिकृतपणे राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ छापा टाकून केलेल्या कारवाईत १३ बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते.
पोलिसांच्या त्पासामध्ये या सर्व आरोपींकडे भारतीय नागरिकत्वाचा कोणताही पुरावा आढळून आला नाही. यानंतर रत्नागिरी पोलीस दलाने पासपोर्ट अधिनियम आणि परदेशी व्यक्ति अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पूर्णगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रत्नदीप साळोखे यांनी पूर्ण केला आणि मुदतीत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
याप्रकरणी झालेल्या सुनावणीत मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी यांनी १३ आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी ६ महिन्यांची साधी कैद आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दहशतवादी विरोधी पथक आणि तपास अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच, या प्रकरणात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे.