निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा निवडणूक विभागाने घेतलेल्या मोहिमेमुळे रत्नागिरी जिल्ह्य़ातील मतदारांची संख्या १३ हजारांनी वाढली असून जिल्ह्य़ामध्ये एकूण ११ लाख ७२ हजार ११५ मतदार झाले आहेत.
जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी या संदर्भात आज येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, गेल्या वर्षी १ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर दावे आणि हरकती स्वीकारून त्याच महिन्यात विशेष मोहीम राबवण्यात आली. त्यानुसार दावे-हरकतींवर देण्यात आलेले निकाल, प्राप्त स्वीकृत अर्जाची नोंद, स्थलांतरित, मृत किंवा दुबार नोंदणी झालेल्या मतदारांची नावे वगळून नव्याने पुरवणी मतदार यादी तयार करण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून एकूण ५३ हजार ४९२ मतदार वाढले आहेत, तर ३९ हजार ६९२ मतदारांची नावे कमी झाली आहेत. त्यामुळे एकूण वाढलेल्या मतदारांची संख्या १३ हजार ८५५ झाली आहे. तसेच जिल्ह्य़ातील एकूण मतदार संख्या ११ लाख ७२ हजार ११५ झाली आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात मतदारसंख्येमध्ये सर्वात जास्त घट (१२ हजार २९०) झाली आहे; त्याचप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये सुमारे ९ ते ११ हजार मतदार वाढले आहेत.
प्रत्येक मतदारसंघाची प्रारूप मतदार यादीनुसार छायाचित्रांसह मतदार यादी आणि ओळखपत्रे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून आत्तापर्यंत सुमारे ९२ टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान जिल्ह्य़ातील प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची बैठक आज आयोजित करण्यात आली, पण फक्त काँग्रेस आणि भाजपचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे मतदान केंद्रवार अधिकृत प्रतिनिधी नियुक्त करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा