नगरमधील जुन्या प्रसिद्धिपत्रकात राज्यभरातील गुन्हेविषयक घडामोडींचे विवरण
जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्हेगारीविषयक घडामोडींची माहिती रोज वृत्तपत्रांकडे प्रसिद्धीला दिली जाते. परंतु या गुन्हेगारी विषयक प्रसिद्धी पत्रकाला तब्बल १३४ वर्षांचा इतिहास आहे. ब्रिटिशकाळात नगरमधून प्रसिद्ध होणाऱ्या ‘गावगन्ना सर्क्युलर’ या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्राचे स्वरुप केवळ अशाच प्रसिद्धी पत्रकाचे होते आणि विशेष म्हणजे हे वृत्तपत्र जरी खासगी प्रकाशकाकडून प्रसिद्ध केले जात असले तरी त्यावर त्यावेळच्या ‘पोलिस अधीक्षक’ यांची अधिकृत सही असायची. नगरमधील ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व संशोधन केंद्राकडे या ‘गावगन्ना सर्क्युलर’चे १८९५ ते १९१० या कालावधीतील मोडी लिपीतील सुमारे शंभर अंक जतन करुन ठेवण्यात आलेले आहेत.
मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरु केले. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधत दरवर्षी ६ जानेवारीला ‘पत्रकार दिन’ साजरा केला जातो. उद्या, रविवारी होणाऱ्या ‘दर्पण दिना’निमित्त संग्रहालयातील क्युरेटर संतोष यादव यांनी जतन करण्यात आलेल्या ‘गावगन्ना सर्क्युलर’कडे लक्ष वेधत ‘लोकसत्ता’ला याची माहिती दिली. पोलिसांकडून आज इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध केली जाणारी क्राईम प्रेसनोट व ब्रिटिशकालीन पोलिस अधीक्षकांच्या सहीने ‘गावगन्ना सर्क्युलर’ यात साधम्र्य असल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र आजची प्रेसनोट अत्यंत संक्षिप्त स्वरुपात असते, तर त्या वेळी प्रसिद्ध केली जाणारी गुन्ह्य़ाची माहिती बारीकसारीक घडामोडी व वर्णनासह दिसते.
गावगन्ना सर्क्युलरच्या १७ ऑक्टोबर १८९२ च्या अंकात त्याला ७ वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख आहे. म्हणजे पहिला अंक १८८५ मध्ये प्रसिद्ध झाला. १८९२ मधील अंकावर सुप्रिडेंट ऑफ पोलिस म्हणून हेन्री केनेडी यांची सही आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक ही दोन्ही पदे त्या वेळी एकाच अधिकाऱ्याकडे असत. वेगवेगळ्या अंकावर वेगवेगळ्या पोलिस अधीक्षकांची सही आहे.
नेमकी काय माहिती असायची
गुन्हेविषयक घडामोडींच्या माहितीला अधिकृत दर्जा प्राप्त व्हावा, याच उद्देशाने त्यावेळचे पोलिस अधीक्षक आपल्या सहीची मोहर त्यावर उठवत असावेत. तसेच, घडामोडींची माहिती देताना त्यात पुढील तपास कोणी करावा, कोणाकडे सोपवला आहे, याच्याही सूचना, आदेश दिल्याचा उल्लेख असल्यामुळे ते पोलिसांकडूनच प्रसिद्ध केले जात असावे व गुन्हा दाखल केल्यानंतरच त्याची माहिती प्रसिद्ध केली जात असावी, असाही अंदाज यादव यांनी व्यक्त केला. नगरमधील बालाजी प्रेसमधून या गावगन्ना सर्क्युलरची छपाई होत होती.
गावगन्ना सर्क्युलर जरी नगरमधून प्रसिद्ध होत असले तरी त्यात राज्यभरातील गुन्हे विषयक घडामोडींची माहिती दिली जात असे. गुन्हेगाराच्या चेहरेपट्टीचे सविस्तर वर्णन केले जायचे. तपास कसा करावा याचीही माहिती असे. ती पद्धत पोलिस आजही तपासासाठी वापरतात. गुन्ह्य़ांच्या बाबतीत गावच्या पोलिस पाटलाने कोणती काळजी घ्यावी, याच्याही सूचना त्यात दिल्या जायच्या. शिवाय गुन्हेगार जर तुमच्या गावात आढळला तर जबाबदार धरले जाईल, असा इशाराही अनेक घडामोडीतून दिलेला आहे. गावगन्ना सर्क्युरल मोडीलिपीत व शिळाप्रेसवर छापून प्रसिद्ध केले जाई. शिळाप्रेसमध्ये फरशीवर अक्षरे कोरुन त्याची छपाई केली जात असे. ‘गावगन्ना सर्क्युलर’ दर पंधरवाडय़ास प्रसिद्ध केले जात असे.
सरकारी परिपत्रकच!
‘गावगन्ना’ या शब्दाचा अर्थ ग्रामीण भागात खबरी असाही आहे. पोलिस अधीक्षकांच्या सहीमुळे ‘गावगन्ना सर्क्युलर’ हे सरकारी परिपत्रक समजावे लागेल. मात्र त्याचे स्वरुप वृत्तपत्रासारखे आहे. या जुन्या अंकातील माहिती पोलिसांना आजही तपासासाठी उपयुक्त ठरेल. कर्जतमध्ये पडलेल्या दरोडय़ाच्या माहितीत तपास लावणाऱ्या पोलिसास दरोडय़ातील रकमेच्या १० टक्के बक्षिस म्हणून दिले जाईल, असेही नमूद केलेले आहे. ‘गावगन्ना सर्क्युलर’वर दोन बाजूला दोन सिंह व वरील बाजूस मध्यभागी तिसरा सिंह असा लोगो आहे. -संतोष यादव, क्युरेटर, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय व संशोधन केंद्र, नगर