पोलिसांनी गुरुवारी रात्री शहराच्या झेंडीगेट भागातील तीन कत्तलखान्यातून १४ गाई व ५७ वासरांची सुटका केली. मात्र या गाई व वासरांची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिकेला अखेर न्यायालयाने दणका दिला व ही ४३ जनावरे ताब्यात घेऊन त्यांची पांजरपोळमध्ये व्यवस्था करण्याचा आदेश दिला. येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला.
झेंटीगेट भागात राहत्या घरात अवैध कत्तलखाने चालवले जात होते. त्याची तपासणी का झाली नाही व घरात ते कसे चालवले जात होते, याबद्दलही खुलासा मागवणारे पत्र पोलीस महापालिकेला पाठवणार असल्याचे समजले. केवळ महापालिकेचेच अधिकारी नाहीतर पशुसंवर्धन तसेच पांजरपोळ चालवणाऱ्या खासगी संस्थांच्या प्रतिनिधींनीही या कारवाईच्या ठिकाणी त्यांना पोलिसांनी कळवूनही उपस्थित राहण्याकडे पाठ फिरवली. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर रात्री उशिरा तेथे आलेल्या मनपा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुमारे २५० किलो वजनाच्या गोमांसाचे बुरुडगाव रस्त्यावरील कचरा डेपोत, खड्डा करून विल्हेवाट पोलिसांना लावावी लागली.
पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काल रात्री दहाच्या सुमारास झेंडीगेट भागातील तीन कत्तलखान्यांवर कारवाई केली. तेथून १४ गाई, ५७ वासरे व एक पिकअप व्हॅन असा सुमारे ११ लाख २८ हजार रुपयांचा माल हस्तगत केला. सर्फराज कादिर कुरेशी (बाबाबंगाली जवळ, झेंडीगेट), आबिद हसन शेख (मुंबई), मतीन अजीज शेख (झेंडीगेट), गणेश अनिल लोखंडे (श्रीगोंदे) व मुख्तार अहमद गुलाम गौस (झेंडीगेट) या पाच जणांना अटक केली.
कारवाई केली, मात्र जप्त केलेल्या जनावरांची देखभाल कशी करावी व गोमांस नाशवंत असल्याने त्याची विल्हेवाट कशी लावावी, याचा पोलिसांपुढे प्रश्न होता. कायद्यानुसार पोलिसांनी मनपा व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला, मात्र कोणीही दाद दिली नाही. नाशवंत मालाची विल्हेवाट लावण्याचे अधिकार पोलिसांकडेच असल्याने अखेर रात्री उशिरा तेथे आलेल्या मनपाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, बुरुडगाव कचरा डेपोमध्ये त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
त्यानंतर काही संस्थांच्या पांजरपोळमध्ये गाईंची व काही वासरांची व्यवस्था करण्यात आली, मात्र ४३ वासरांची देखभाल करण्याची जबाबदारी कोणीच स्वीकारायला तयार नव्हते. त्यामुळे तपासी अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ४३ वासरे मनपाने ताब्यात घेऊन त्यांची व्यवस्था पांजरपोळमध्ये करावी, असा आदेश आज, शुक्रवारी दिला. दरम्यान, अटक केलेल्या पाचही आरोपींची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.