महाराष्ट्र सरकारने अलीकडेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला. हा पुरस्कार सोहळा रखरखत्या उन्हात आयोजित केला होता. या कार्यक्रमाला लाखो अनुयायी उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी लोकांना भरउन्हात तब्बल तीन तास बसावं लागलं. यामध्ये १४ लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या अनुयायांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र भूषण सोहळ्यात कितीजण मृत्यूमुखी पडले? त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला की चेंगराचेंगरीत? असे सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारले. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा चौकशी आयोग नेमावा अशी मागणी आव्हाडांनी केली. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडांनी अन्य एका ट्वीटमध्ये व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओतील चेंगराचेंगरीची घटना कुठे घडली? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
जितेंद्र आव्हाड आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “खरं सांगा… काल खरंच कितीजण मृत्यूमुखी पडले? संबंधित मृत्यू उष्मघाताने झाले की चेंगराचेंगरीत? या कार्यक्रमाचं आयोजन सरकारने केलं होतं, त्यामुळे लपवालपवी करू नका. दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारा. या कार्यक्रमस्थळाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्या आणि जनतेला दाखवा. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी आयोग नेमावा.”
“समाज माध्यमांमधून हा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ मोर्फ केलेला नाही. कारण यामध्ये महाराष्ट्र शासनाची गाडी दिसतेय. हा चेंगराचेंगरीचा प्रकार कुठे घडला असावा?” असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी अन्य एका ट्वीटमध्ये विचारला. संबंधित व्हिडीओची पुष्टी ‘लोकसत्ता’ करत नाही.