मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, त्यासाठी १५ तारखेला विशेष अधिवेशन बोलावावं अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंतरवाली सराटीत बेमुदत उपोषणाला बसले आहेत. या चौथ्या टप्प्यातील उपोषणाला आंतरावाली सराटीत महाराष्ट्रभरातून मराठा समाज एकवटला आहे. त्यामुळे आता आरक्षणाची अंमलबजावणी नाही केली तर काय होईल, हे येणारा काळच सांगेल, असा सूचक इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटलांचा आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. पाण्याशिवाय तीन दिवस राहिल्याने मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना व्यवस्थित चालता-बोलताही येत नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, १५ तारखेला विशेष अधिवेशन बोलावून सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर महाराष्ट्रात काय होतंय हे त्यांच्या लक्षात येणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.
ते पुढे म्हणाले, सरकारने आरक्षण देण्यासाठी टप्पे आखले आहेत. तसंच आम्हीही आमच्या आंदोलनाचे टप्पे पाडले आहेत. आम्ही गाफील राहणार नाही, हे सरकारला माहीत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर महाराष्ट्रात काय होतंय ते सरकारला कळेल.
हेही वाचा >> Maharashtra News Live : “मला उठता-बसता येईना, बोलता येईना”, मनोज जरागेंनी दिली प्रकृतीची माहिती
तसंच, अंमलबजावणी झाली नाहीतर मराठे मुंबईत जातात की अजून कुठे हे मी आता सांगू शकत नाही. तसंच, आम्ही १४ राज्य एकत्र आहोत. हे आंदोलन आता राज्यापुरतं नसून १४ राज्य एकत्र येणार आहेत, असाही इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
चालता बोलता येत नाही
मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता काही पीएचडीधारक विद्यार्थीही आंदोलनाला बसले आहेत. त्यांनाही हक्काची नोकरी मिळावी याकरता त्यांनी हे आंदोलन पुकारले आहे. मात्र, यावरून मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला. तुमची मागणी रास्त आहे, पण तुमच्यापुरता विचार करू नका, समाजाचा विचार करा, असं मनोज जरांगे म्हणाले. तुम्ही शिकलेले आहात, त्यामुळे तुम्ही या आरक्षणाचा अभ्यास करून तोडगा काढला पाहिजे. तुमच्या मागण्या मान्य करून घेऊ, त्यासाठी आपण तीन बैठका लावल्या होत्या. पण, तुम्हीही मराठा समाजातील गोर गरीब विद्यार्थ्यांचा विचार करा आणि त्यांच्या आरक्षणासाठी अडून राहा, अशी विनंती जरांगे पाटलांनी केली. तसंच, मला आता चालता बोलता येत नाही. मला नीट बसताही येत नसल्याची तक्रार मनोज जरांगे पाटलांनी केली आहे.