१४ वर्षांपूर्वीच्या खुनाचा सूड उगवला
सोलापूर : शहरातील वर्दळीच्या ठिकाणी नव्या पेठेलगत शिंदे चौकातील मोबाइल गल्लीत एका तरुणाचा कोयता, तलवारींनी वार करून निर्घृणपणे खून केला. दोन तालमींतील टोळीयुद्धातून १४ वर्षांपूर्वी झालेल्या एका खुनाचा सूड उगविण्यासाठी या तरुणाचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दोघा बाप-लेकांसह आठ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर रविवारी दुसऱ्या दिवशी नव्या पेठेसह परिसरातील व्यापाऱ्यांनी दहशतीपोटी व्यापार बंद ठेवला होता. काही समाजकंटकांनी नव्या पेठेत सकाळी हैदोस घालत व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याबद्दल धमकावले होते.
नव्या पेठेला खेटून असलेल्या शिंदे चौकात पूर्वीच्या ‘मकान’ परिससात अलीकडे मोबाइल व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा बाजार वाढला आहे. त्यामुळे हा भाग मोबाइल गल्ली म्हणून ओळखला जातो. रात्री साडेनऊनंतर येथील बाजार बंद होत असतानाच सत्यवान ऊर्फ आबा विष्णू कांबळे (वय ३२, रा. पत्रा तालीम, उत्तर कसबा, सोलापूर) याचा कट रचून खून करण्यात आला. या प्रकरणी त्याचा भाचा शुभम श्रीकांत धूळराव (वय २३) याने दिलेल्या फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात पाणी वेस भागात राहणाऱ्या सुरेश शिंदे ऊर्फ गामा पैलवान व त्याचा मुलगा रविराज शिंदे याच्यासह इतर पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पत्रा तालीम व पाणीवेस तालीम येथील तरुणांमध्ये १४ वर्षांपूर्वी शिवजयंती उत्सवात संघर्ष झाला होता. त्यातूनच १७ एप्रिल २००४ रोजी पाणीवेशीतील सुरेश शिंदे ऊर्फ गामा पैलवान याचा मुलगा ॠतुराज शिंदे याचा खून झाला होता. यात पत्रा तालीम भागातील मृत सत्यवान ऊर्फ आबा कांबळे याच्यासह अन्य सात जणांना सत्र न्यायालयाने दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्यामुळे मृत आबा कांबळे हा सुमारे अकरा वर्षे कारागृहात होता. मात्र २०१५ साली मुंबई उच्च न्यायालयाने या खटल्यात आबा कांबळे व इतरांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर गेली तीन वर्षे पुन्हा तो नवी पेठ, शिंदे चौक भागात बस्तान बसवून दरारा ठेवून होता. मोबाइल गल्लीत त्याने मोबाइल विक्रीचे दुकान थाटले होते. याशिवाय अन्य व्यवसायातही त्याचा वावर होता. ॠतुराजचे वडील गामा पैलवान व भाऊ रविराज शिंदे यांच्यासह इतरांनी आबा कांबळे याच्यावर पाळत ठेवून त्याचा पाठलाग करून खून केला.