सोलापूर : माढा तालुक्यातील आढेगाव येथे एका १४ वर्षांच्या शाळकरी मुलाने घरात स्वतःच्या डोक्यात वडिलांच्या रिव्हाॅल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. मात्र या घटनेचे निश्चित कारण समजू शकले नाही. श्रीधर गणेश नष्टे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील गणेश सदाशिव नष्टे हे राजस्थानमध्ये सशस्त्र सीमा बल गटात प्रशिक्षक म्हणून सेवेत आहेत. ते आढेगावचे मूळ राहणारे असून गावात त्यांच्या घरी वडील सदाशिव नष्टे, पत्नी सारिका आणि श्रीधर व श्रेयश ही दोन मुले राहतात. गणेश नष्टे यांच्याकडे सरकारी परवाना असलेले रिव्हाॅल्व्हर आहे. काही दिवसांपूर्वी रजा काढून गावी आले आहेत.
सोमवारी दुपारी घरी नष्टे यांचा किशोरवयीन मुलगा श्रीधर याने वडिलांच्या रिव्हाॅल्व्हरने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नष्टे कुटुंबीयांस धक्का बसला आहे. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.