महाराष्ट्रात काही ठिकाणी मराठा आंदोलन शांततेत पार पडलं. तर, काही ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. जाळपोळ आणि हिंसक वळण लागलेल्या ठिकाणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ५४ गुन्हे दाखल करण्यात आले असून १०६ जणांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
रजनीश सेठ म्हणाले, “बीडमध्ये २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, ३०७ कलमांतर्गत ७ गुन्हे दाखल केले आहेत. बीड शहरात संचारबंदी लागू केली आहे. तसेच, बीड, संभाजीनगर ग्रामीण आणि जालन्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.”
हेही वाचा : “…म्हणून मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा”, सुप्रिया सुळेंची मोठी मागणी
“महाराष्ट्रात २४ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान १४० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील १६७ जणांना अटक, तर १४६ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. राज्यात १२ कोटी रूपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आहे. १७ एसआरपीएफच्या तुकड्या वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. बीडमध्ये ‘रॅपिड अॅक्शन फोर्स’ दाखल झाली आहे. राज्यात अतिरिक्त ७ हजार होमगार्डही तैनात करण्यात आले आहेत,” अशी माहिती रजनीश सेठ यांनी दिली.
हेही वाचा : मराठा आरक्षणाप्रश्नी सर्वपक्षीय बैठकीवर संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारनं…”
“कायद्याचं उल्लंघन आणि जाळपोळ करणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करेल. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला पोलीस सहकार्य करतील. कायद्याचे उल्लंघन आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांवर पोलिसांनी आवश्यक कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना मिळाल्या आहेत,” असेही रजनीश सेठ म्हणाले.