मागील तीन दिवसांत राज्यसभा आणि लोकसभेतील १४१ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांचं एवढ्या मोठ्या संख्येनं निलंबन केल्यामुळे देशभर खळबळ उडाली आहे. १३ डिसेंबर रोजी संसदेत झालेल्या घुसखोरीवर गृहमंत्री अमित शाह किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावं, अशी मागणी केल्याने तब्बल १४१ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
१४१ खासदारांचं निलंबन म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. हे खासदारांचं निलंबन नव्हे तर संसदेतून थेट लोकशाहीचं निलंबन आहे, अशी प्रतिक्रिया आमदार आव्हाड यांनी दिली.
एक्सवर (पूर्वीचं ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले, “देशाच्या संसदेत भाजपाने वर्षानुवर्षे विरोधी पक्षाची भूमिका निभावलेली आहे. तेव्हा सत्ताधाऱ्यांनी ती भूमिका कायम ऐकून घेतली. पण सत्ताधारी बाकावर बसल्यानंतर भाजपाने हुकूमशाही सुरु केलीये. काल आणि आज मिळून एकूण १४१ विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. मुळात लोकशाहीत संवाद महत्त्वाचा आहे आणि त्यासाठीच विरोधी पक्षदेखील प्रश्न विचारण्यासाठी महत्त्वाचे आहेत.”
“पंतप्रधान देशाच्या संसदेत लोकप्रतिनिधींसोबत संवाद साधायला तयार नाहीत आणि गोंधळासारख्या क्षुल्लक कारणावरून खासदारांचं निलंबन केलं जातंय. लोकशाहीप्रधान भारतातील संसदेच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे,” असंही आव्हाड म्हणाले.