छत्तीसगडच्या सुकमा जिल्हय़ात मंगळवारी पहाटे पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत १५ नक्षलवादी ठार झाल्याचा दावा छत्तीसगड पोलिसांनी केला आहे.
गेल्या दोन आठवडय़ांपासून पोलिसांनी नक्षलवाद्यांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली असून आतापर्यंत २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. यापैकी दोन मोठय़ा चकमकी गडचिरोलीत झाल्या. ९ नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून यात जहाल नक्षलवादी कंकाला राजीरेड्डी ऊर्फ व्यंकण्णाचा समावेश आहे.
सुकमा व आंध्र प्रदेशातील खम्मम जिल्हय़ाच्या सीमेवर कंचला व पुरेटी गावाच्या दरम्यान असलेल्या जंगलात नक्षलवाद्यांचे एक शिबीर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या आधारे छत्तीसगड व आंध्रमधील पोलिसांनी सोमवारी सायंकाळपासून शोध मोहीम हाती घेतली होती. पहाटे पोलीस व नक्षलवादी समोरासमोर आल्यानंतर चकमक सुरू झाली.
घटनास्थळावरून पोलिसांनी ११ स्वयंचलित बंदुका जप्त केल्या आहेत. चकमकीत ठार झालेल्या व्यंकण्णाच्या शिरावर आंध्र पोलिसांचे पाच लाखांचे इनाम होते. त्याच्यासह सुधाकर व पुष्पक हे दोन कमांडरसुद्धा या चकमकीत मारले गेले.