कोयना धरण परिसरासह त्याखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठी आज सोमवारी उष्म्याचा कहर राहताना, दुपारनंतर ढग दाटून आलेल्या वातावरणात जोरदार पावसाची अपेक्षा असताना, केवळ तुरळक सरी कोसळून ढगाळ वातावरण कायम राहिले. कोयना प्रकल्पाच्या तांत्रिक वर्षांस काल १ जूनपासून प्रारंभ झाला. परंतु, गतवर्षी सुरुवातीपासून हलत्या राहिलेल्या कोयनेच्या पर्जन्यमापन नोंदवहीवर यंदा पावसाच्या नोंदींचा श्रीगणेशा होऊ शकलेला नाही.
दरम्यान, विविध प्रकल्पांतील चिंताजनक पाणीसाठा पाहता यंदा जूनच्या पहिल्या सप्ताहात मान्सूनचे आगमन होणे अपेक्षित असले तरी लहरी मान्सून वेळेत कोसळेल किंवा काय याचे अंदाज पडताळत बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. सध्या महाकाय कोयना शिवसागराची पाणीपातळी २,०४५.६ फूट, तर पाणीसाठा १६.१२ टीएमसी (१५.३१ टक्के) आहे. गतवर्षी हाच पाणीसाठा ३२.९४ टीएमसी म्हणजेच दुपटीहून जादा असून, आजमितीच्या तुलनेत गतवर्षी अडीचपट उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. परिणामी गतवर्षीचा पाणीसाठा विचारात घेता कोयना धरणातील आजमितीची पाण्याची स्थिती चिंताजनक आहे, मात्र दुसऱ्या लेक टॅपिंगमुळे वीजनिर्मिती व पाणी वापराला अभय मिळाले आहे. यंदा अजून ११ टीएमसी पाणीसाठा वापरण्यासाठी उपलब्ध आहे. परिणामी, मान्सून काहीसा लांबला तरी कोयनेची वीजनिर्मिती व पूर्वेकडे मागणीप्रमाणे पुरेल इतका पाणीसाठा तूर्तास तरी उपलब्ध असल्याचे धरण व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.
कोयना धरणाचा पाणीसाठा १५ टक्के; नव्या तांत्रिक वर्षांत पावसाची नोंद नाही
कोयना धरण परिसरासह त्याखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठी आज सोमवारी उष्म्याचा कहर राहताना, दुपारनंतर ढग दाटून आलेल्या वातावरणात जोरदार पावसाची अपेक्षा असताना, केवळ तुरळक सरी कोसळून ढगाळ वातावरण कायम राहिले.
First published on: 03-06-2014 at 02:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15 percent water supply in koyna dam no comment of rainfall in new technical year