८००० नागरिकांसाठी एनडीआरएफचे १५ तंबू, तर शासनाकडून केवळ १५ ताडपत्री शेड

विजय राऊत, कासा

गेल्या तीन महिन्यांपासून डहाणू आणि तलासरी या परिसरात भूकंपाचे ३० पेक्षा अधिक लहान-मोठे धक्के बसल्याने नागरिकांची सुरक्षितता म्हणून डहाणू तालुक्यातील शिसने ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत करंजवीरा आणि पांढरतारा गावांतील आठ हजार लोकसंख्येसाठी एनडीआरएफ आणि शासन यांच्याकडून १५ तंबू आणि १५ ताडपत्री शेड देण्यात आले आहेत. एका तंबूमध्ये जास्तीत जास्त १० लोक राहू शकत असताना एवढय़ा लोकांसाठी ते कसे पुरणार, हा प्रश्न शासकीय यंत्रणेला का पडू नये, असा सवाल भूकंपग्रस्तांकडून विचारला जात आहे. अत्यंत तोकडी मदत देऊन शासनाने क्रूर चेष्टा केल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून या भागात भूकंपाच्या धक्कय़ाने ग्रामस्थ हैराण आहेत. भूकंपाने आतापर्यंत ४.१ रिश्टर स्केलची नोंद केल्याने सगळ्याच शासकीय यंत्रणा हादरल्या आहेत. या भूकंपात घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून काही ठिकाणी भिंती पडल्या आहेत तर काही घरांचे छत उद्ध्वस्त झाले आहेत. या भागांतील बहुतेक घरे कुडाची व विटा-मातीची असल्याने भूकंपात या घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. भूकंपाच्या वाढत्या घटना पाहता स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी अनेकदा सुरक्षित स्थळी हलवण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने १५ तंबू व १५ ताडपत्री शेडची सोय केली. मात्र भूकंपग्रस्तांसाठी उभ्या केलेल्या तंबूंची मदतही तोकडीच आहे. गेल्या आठवडय़ात डहाणू व तलासरीवासीयांना धीर देण्यासाठी एनडीआरएफचे बचाव दल दाखल झाले. मात्र शेकडो गाव-पाडय़ांसाठी त्यांनी आणलेल्या फक्त २०० राहुटय़ांमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या राहुटय़ा म्हणजे आमची चेष्टा असून ही मदत तोकडीच असल्याचे नागरिकानी सांगितले. गाव-पाडय़ांची संख्या पाहता एका गावाच्या वाटय़ाला एक किंवा दोन राहुटय़ा मोठय़ा मुश्किलीने येतील, अशी स्थिती आहे. त्यातच त्यांच्या लांबी-रुंदीचा विचार केला तर एका कुटुंबाची सोय त्यात होत आहे. जर एका गावात ७० ते १५० कुटुंबे राहात असतील तर इतरांनी उघडय़ावर राहायचे का, असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांना विचारला जाऊ  लागला आहे.

घरापासून दूर राहुटीत रात्री राहिल्यास आपल्या घरी चोरी होण्याची भीती असल्याने अनेक ग्रामस्थ तंबूत राहावयास तयार नाहीत. ते घराजवळच उघडय़ावर झोपत आहेत. हा परिसर दुर्गम व जंगलपट्टा असून रात्रीच्या वेळी सरपटणाऱ्या प्राण्यांचाही या ठिकाणी धोका आहे. घरात झोपावे तर भूकंपाची भीती, बाहेर झोपावे तर सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका आणि तंबूमध्ये तर जागा अपुरी अशा मन:स्थितीत येथील नागरिक आहेत.

त्यामुळे शासकीय यंत्रणेने घरटी एक तंबूचे वाटप करावे, अशी मागणी पीडितांनी केली आहे. शासनाने १५ तंबू आणि १५ ताडपत्री शेडचे वाटप करून भूकंपपीडितांची थट्टा केली. या मदतीमुळे भूकंपग्रस्त अजिबात सावरणार नाहीत, असे येथील नागरिकांनी सांगितले.

‘मदत ओघ धुंदलवाडीलाच का?’

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून डहाणू व तलासरी या भागात साधारणपणे ३० पेक्षा जास्त भूकंपाचे धक्के बसले आहेत या दोन तालुंक्यातील ४८ गावांना या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. परंतु शासकीय यंत्रणेचा मदतीचा ओघ मात्र फक्त डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी याठिकाणी होत असल्याचा आरोप इतर गावातील नागरिकांनी केला आहे या दोन तालुक्यांतील बरीचशी गावे भूकंप पट्टय़ात आहेत. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून देण्यात आलेले तंबू, ताडपत्री व इतर सुविधा या फक्त धुंदलवाडीपर्यंत पोहोचल्या असून या भागातील इतर गावांना मात्र फार कमी सुविधा मिळत असल्याचा आरोप अन्य गावांतील ग्रामस्थ करत आहेत.

शासनाने सध्या भूकंपग्रस्तांना १५ तंबू व १५ ताडपत्रीची मदत केली असून वाढीव ६५० ताडपत्री डहाणू आणि तलासरी भागात दिल्या जाणार आहेत. वाढीव प्रस्ताव शासनाला पाठवला आहे. लवकरच वाढीव मदत मिळेल.

-राहुल सारंग, तहसीलदार, डहाणू

तीन महिन्यांपासून या भागात भूकंपाचे धक्के बसत असून सुरक्षिततेसाठी १५ तंबू आणि १५ ताडपत्री देण्यात आल्या आहे. परंतु येथील लोकसंख्येचा विचार करता शासनाने तुटपुंजी मदत दिली आहे.

– कना गडग, सरपंच, शिसने

Story img Loader