सोलापूर : पंढरपुरात संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या स्मारक उभारणीचा प्रश्न मार्गी लागत असून पंढरपुरात रेल्वेच्या मालकीची १६ एकर जागा मिळाली आहे. त्यापैकी काही जागा संत नामदेव महाराजांच्या स्मारकासाठी मिळणार आहे. या स्मारकासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली.पंढरपुरातील रेल्वेच्या १६ एकर जागेच्या मोबदल्यात राज्य शासनाकडून पालघर येथील जागा रेल्वेला देण्याचे ठरविले आहे.

२०१४ पासून पंढरपुरात संत नामदेव स्मारक उभारण्याचा प्रयत्न सुरू होता. सुरुवातीला या स्मारकाच्या उभारणीसाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च गृहीत धरण्यात आला होता. परंतु जागा उपलब्ध होत नसल्यामुळे स्मारक उभारण्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. पंढरपुरात रेल्वेच्या मालकीची मुबलक जागा आहे. त्यापैकी काही जागा उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न चालविले होते. अखेर त्यास यश आले आहे. रेल्वेच्या मालकीची १६ एकर जागा राज्य सरकारला मिळाली आहे. त्या मोबदल्यात रेल्वेला पालघर येथील जागा राज्य सरकारने देण्याचे निश्चित केले आहे. पंढरपुरात रेल्वेकडून मिळालेल्या जागेपैकी काही जागा संत नामदेव महाराजांच्या स्मारकासाठी उपलब्ध होणार असल्याचे आशीर्वाद यांनी सांगितले.

संत नामदेव महाराजांचे स्मारक पंढरपुरात उभारण्यासाठी नामदेव समाजोन्नती परिषदेने सुरुवातीपासून पाठपुरावा चालविला असून दुसरीकडे राज्य सरकारनेही त्यास प्रतिसाद देत पंढरपुरातील रेल्वे बोर्डाच्या मालकीची जागा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न हाती घेतले होते. त्यास यश आल्याबद्दल नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या माहितीनुसार पंढरपुरात उभारण्यात येणाऱ्या संत नामदेव महाराजांच्या स्मारकासाठी सुमारे २५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या स्मारकासाठी विविध सात संस्थांकडून अभिप्राय मागविण्यात येत असून त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत स्मारकाचा अंतिम आराखडा तयार करण्यात येणार आहे.