दुर्घटनेला कारणीभूत अधिकाऱ्यांवर कारवाई नाहीच
महाड दुर्घटनेला १६ दिवस पूर्ण झाले असले तरी या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही.
मुंबई -गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल २ ऑगस्टला वाहून गेला. या दुर्घटनेत २ एसटी बससह एक तवेरा वाहून गेली. यात २८ जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण अद्यापही बेपत्ता आहेत. बचाव पथकांकडून उर्वरित मृतदेहांचा शोध थांबवण्यात आला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे अनेक कुटुंबांवर मोठी आपत्ती ओढावली. अनेकांच्या जीवनात कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. दुर्घटनेला महामार्ग प्राधिकरणाचा गलथान कारभार जबाबदार असल्याची माहिती समोर आली. विरोधी पक्ष याबाबत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. घटनेची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात दिले.
गुरुावारी या घटनेला १६ दिवस पूर्ण झाले. पहिले १६ दिवस मदत व बचावकार्यात निघून गेले, पण दुर्घटना नेमकी का घडली, पूल खरंच वाहतुकीस योग्य होता का, पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते का, दोन वर्षांपूर्वीच पूल धोकादायक असल्याबाबत तक्रारी देऊनही त्याची दखल का घेतली गेली नाही, नवीन पूल बांधल्यानंतरही जुन्या पुलावरून वाहतूक का सुरू ठेवली, दुर्घटनेस महामार्ग प्राधिकरणचा गलथानपणा कारणीभूत ठरला की नाही, यासारखे असंख्य प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महामार्ग प्राधिकरणावर आरोप केले जात आहेत. त्या महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि कर्मचारी याबाबत एक शब्दही बोलायला तयार नाहीत. प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता पेण येथील कार्यालयात फिरकले नाहीत. ते कधी येणार, कुठे येणार? हे माहीत नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे २८ जणांचा बळी घेणाऱ्या आणि १२ जण बेपत्ता असणाऱ्या दुर्घटनेचे प्राधिकरणाला गांभीर्य आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
दुर्घटनेत दगावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना आíथक मदत दिली म्हणजे विषय संपला असे नाही. या घटनेची सखोल चौकशी केली जावी आणि ज्या अधिकाऱ्यांवर या पुलाच्या देखरेखीची जबाबदारी होती, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी माजी आमदार माणिक जगताप यांनी केली आहे.
रविवारी नाशिकमध्ये भव्य मिरवणूक
नाशिक : श्री माताजी निर्मलादेवी यांच्या परमकृपेने श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने विश्वशांती व विश्वकल्याणासाठी भव्य मिरवणूक, कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्काराचा कार्यक्रम रविवार, २१ ऑगस्ट २०१६ रोजी सायं ६ वा. जैन धर्मशाळा, नांदगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. सहजयोग प्रचार व प्रसार करून सामान्य जनतेस आत्मसाक्षात्कार देणे, उत्तम साधक कसे बनावे याचे प्रशिक्षण देणे, दैनंदिन जीवनात सहजयोगाचे महत्त्व पटवून देणे आदी या संस्थेची उद्दिष्टे आहेत. सहजयोग रीसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट सेंटर नाशिक येथे २०१३ पासून कार्यान्वित आहे.