सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल सुनावला आहे. न्यायालयाने शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला आहे. त्यामुळे या १६ आमदारांबाबत नार्वेकर काय निर्णय घेणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं विधान केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरणार नाहीत. संबंधित १६ आमदार अपात्र ठरले तरी शिंदे-फडणवीस सरकारला कसलाही धोका नाही, असं विधान अजित पवार यांनी केलं. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय कधी घेणार? विधानसभा अध्यक्षांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र होणार नाहीत”, या अजित पवारांच्या विधानाबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी यावर काहीही बोलू शकत नाही. हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे आहे. त्यांच्याकडे यावर सुनावणी होणार आहे. याबाबत जो काही निर्णय द्यायचा आहे, तो निर्णय विधानसभा अध्यक्ष देतील.”

हेही वाचा- भरत गोगावलेंची प्रतोदपदी पुन्हा नियुक्ती होणार? विधानसभा अध्यक्षांचं थेट विधान, म्हणाले…

“पण एक अभ्यासक, एक वकील आणि २५ वर्षे विधानसभेत कार्य केलेली व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की, आता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला पुरतं समजलं आहे की, पोपट मेला आहे. तरीदेखील तो मान हलवत नाही. तो हातपाय हलवत नाहीये, अशाप्रकारच्या गोष्टी ते बोलतायत. अशा गोष्टी बोलणं त्यांना सहाजिकच आहे. कारण त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना दाखवावं लागतं की, आशा जिवंत आहेत,” अशी उपरोधिक टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.

हेही वाचा- “…तर अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यास विलंब होईल”, लंडनहून परतताच विधानसभा अध्यक्षांचं मोठं विधान

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

अजित पवार म्हणाले की, आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. २८८ पैकी यदाकदाचित त्या १६ आमदारांचा निकाल काही वेगळा (आमदार अपात्र ठरले) लागला. वेगळा निकाल लागणारच नाही. पण समजा निकाल वेगळा लागला तरी त्या निकालाचा सरकारच्या बहुमतावर कुठलाही परिणाम होणार नाही. २८८ पैकी १६ आमदार अपात्र ठरले तर राहतात २७२ आमदार, मग बहुमताचा आकडा कमी होतो. तेवढं बहुमत त्यांच्याकडे आहे. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा सरकारवर काहीही परिणाम होईल, असं सध्या दिसत नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 16 mla wont disqualify devendra fadnavis reaction on ajit pawar statement rmm