राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य करण्यासाठी राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या १६ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली.

मुंबई, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासनाची आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहे. राज्यात अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या १६ टीम राज्याच्या विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन व सर्व आपत्कालीन यंत्रणांना सतर्क आहेत. तसेच जनतेला घरातच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले आहे.

दरम्यान, मुंबईत ५, कोल्हापूरात ४, सांगलीत २, साताऱ्यात १, ठाण्यात १, पालघरमध्ये १, नागपूरात १, रायगडमध्ये १ अशा एकूण १६ एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

Story img Loader