उत्तराखंडमध्ये आलेल्या अस्मानी संकटात राज्यातील सुमारे एक हजार पर्यटक अडकले असून एकटय़ा बद्रीनाथमध्ये अडकलेल्यांची संख्या ५०० आहे. त्यांच्या सुटकेसाठी लष्कराचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, १६० लोकांचा अद्याप ठावठिकाणाच लागलेला नाही. तर १८०० मराठी भाविक परतीच्या प्रवासाला निघाले असल्याची माहिती महाराष्ट्राच्या पदत पथकातील सूत्रांनी दिली आहे.
 उत्तराखंडात अडकलेल्या मराठी प्रवाशांची सुटका करून त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकारने ५० जणांचे पथक उत्तराखंडात रवाना केले आहे. या कामात समन्वय ठेवण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त आर. ए. राजीव आणि राष्ट्रीय ग्रामीण मिशनचे संचालक विकास खरगे यांना पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत १८०० जणांची सुटका करण्यात आली असून त्यांना राज्य सरकराच्या विविध मदत केंद्रांच्या माध्यमातून डेहराडूनपर्यंत पोहोचविण्यात आले आहे. तेथून त्यांना बस आणि रेल्वेमार्गे दिल्लीकडे रवाना करण्यात येत आहे. मदतीचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी अद्याप एक हजार भाविक विविध भागांत अडकले आहे. गौरीकुंडमध्ये अडकलेल्या काही पर्यटकांचा शोध लागला असून त्यांना सुरक्षितस्थळी आणण्यात आले आहे. मात्र, तब्बल ४००-५०० पर्यटक बद्रीनाथमध्ये अडकले आहेत. या लोकांशी संपर्क साधण्यात आला असला तरी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कसलीच सुविधा नाही.  पर्यटकांपर्यंत जाणारा रस्ताच पूर्णपणे वाहून गेला असून डोंगरदऱ्या आणि खराब हवामान यामुळे त्यांच्याशी पोहोचणेच अवघड झाले आहे. त्यातच रविवारी खराब हवामानामुळे या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात अडचणी येत होत्या. सर्वात चिंतेची बाब म्हणजे अजूनही १६० लोकांचा संपर्कच झालेला नसून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
५२० भाविक महाराष्ट्राकडे रवाना
राज्यातील आपद्ग्रस्तांपैकी ५२० जणांना रविवारी दिल्लीतून राज्याकडे रवाना करण्यात आले. तर ३५१ यात्रेकरू नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सुखरूप आहेत. बेपत्ता असलेल्या यात्रेकरूंची छायाचित्रे आणि नावे Dysecmcr@gmail.com वर पाठविण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. सुखरूप सुटका झालेल्या नागरिकांच्या परतीसाठी मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाडय़ांना विशेष डबे जोडण्यात येणार आहेत.

Story img Loader