जि. प. च्या इतिहासात प्रथमच तब्बल १७ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प मांडण्याची नामुष्की अर्थ व बांधकाम सभापती संदीप क्षीरसागर यांच्यावर ओढवली. शुक्रवारी आयोजित सर्वसाधारण सभेत क्षीरसागर यांनी चालू वर्षांचा सुधारित, तसेच २०१५-१६ चे मूळ अंदाजपत्रक सादर केले. तुटीचे अंदाजपत्रक मांडताना पुढील वर्षी जमा होणाऱ्या साडेदहा कोटी रुपये निधीतून प्रशासकीय बाबींसह समाजकल्याण, शिक्षण व आरोग्य या महत्त्वाच्या योजनांसाठी तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले.
मागील वर्षभरात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा अधिकारी यांनी केलेल्या मनमानीमुळे तरतूद नसताना तब्बल ३० कोटींचा अतिरिक्त खर्च करण्यात आला. परिणामी जि. प. च्या इतिहासात प्रथमच तुटीचा अर्थसंकल्प मांडण्याची नामुष्की ओढवली. जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, उपाध्यक्ष आशा दौंड, सभापती बजरंग सोनवणे, महेंद्र गर्जे, कमल मुंडे यांची उपस्थिती होती.
सभापती क्षीरसागर यांनी पुढील वर्षभरात जमा होणाऱ्या १० कोटी ५५ लाख ८९ हजार रुपये निधीतून १० कोटी ५८ लाख ६५ हजार रुपयांच्या प्रशासकीय व इतर बाबींसाठी तरतूद केली. मागील वर्षी तरतुदीपेक्षा मोठय़ा प्रमाणात खर्च झाल्यामुळे २८ कोटी ९३ लाख ८७ हजार ५६६ रुपयांचे देणे द्यावे लागणार असल्याचे नमूद केले. पुढील वर्षांसाठी सामान्य प्रशासन विभागांतर्गत पदाधिकाऱ्यांचा प्रवास, वाहन व इतर खर्चासाठी ६४ लाख रुपये, अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय खर्चासाठी ४८ लक्ष २३ हजार, शिक्षण विभागासाठी १ कोटी ३९ लाख, तर इमारत व दळणवळण या लेखाशीर्षांतर्गत ५६ लाख ६० हजार, पाटबंधारे विभागासाठी १ कोटी २ लाख, सार्वजनिक आरोग्य विभागासाठी ३१ लाख, कृषी विभागाला केवळ ३ लाख तर पशुसंवर्धनला ४ लाख आणि समाजकल्याण विभागासाठी सरकारच्या धोरणानुसार एकूण उत्पन्नाच्या २० टक्क्य़ांप्रमाणे सव्वा कोटी रुपये, तसेच अपंग पुनर्वसनासाठी २१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.

Story img Loader