रत्नागिरी जिल्ह्य़ाच्या विविध भागातून चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये गेलेले १७ जण तेथील महाप्रलयामुळे अडकले आहेत. पण सर्वजण सुखरूप असल्याची माहिती येथे आली आहे. मुसळधार पाऊस आणि महापुराने सध्या उत्तराखंडमध्ये धुमाकूळ घातला असून देशभरातील हजारो यात्रेकरू तेथे विविध ठिकाणी अडकले आहेत. रत्नागिरी जिल्ह्य़ातून तेथे गेलेल्या यात्रेकरूंच्या सुखरूप सुटकेसाठी जिल्हा नियंत्रण कक्षातर्फे समन्वयाचे काम सुरू करण्यात आले आहे. येथे उपलब्ध माहितीनुसार, खेडमधील तीन महिला दिल्लीत, तर चिपळूणचे सहा जण आणि रत्नागिरीचे आठ जण गुप्तकाशी येथील छावणीमध्ये सुखरूप आहेत.
या यात्रेकरूंपैकी खेडच्या साधना पुरुषोत्तम धारिया (वय ७४ वष्रे), छाया रमेश तलाठी (वय ६१ वष्रे, कळंबणी) आणि लता रमेश शेठ या तीन महिला सुदैवाने प्रलयाच्या वेळी दिल्लीपर्यंतच पोचल्या होत्या. त्यामुळे त्या तेथूनच माघारी येण्यास निघाल्या आहेत. उरलेल्या यात्रेकरूंपैकी चिपळूणचे प्रकाश धोंडू साडविलकर (५४), सुनील हरी गावडे (५२), दिलीप पवार (५०), सी.बी. सुर्वे (५२), आबा म्हाडदळकर (६६) आणि एकनाथ साळुंखे (५०) हे सहा जण केदारनाथला गेले होते. ते गुप्तकाशी येथील छावणीमध्ये सुखरूप असल्याची माहिती येथे मिळाली आहे. रत्नागिरी (शिवाजीनगर) येथील प्रकाश गोरखनाथ रिसबूड (४५), प्राजक्ता प्रकाश रिसबूड (४२), प्रथमेश रिसबूड (१९), प्रज्ञेश रिसबूड (१२), गोरखनाथ रिसबूड, जयश्री गोरखनाथ रिसबूड, मनोहर यशवंत देवधर इत्यादी नऊ जणांचा समावेश आहे. नाशिकच्या चौधरी यात्रा कंपनीमार्फत हे सर्व जण केदारनाथला गेले होते. ते सर्व जण सुखरूप असल्याची माहिती मनोहर देवधर यांनी एसएमएसद्वारे कळवली आहे.
दरम्यान या परिसरात यात्रेसाठी गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांकडून माहिती गोळा करून समन्वय साधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षासह (०२३५२-२६६२४८, २२२४८३) प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे संबंधितांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारीराजीव जाधव यांनी केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्य़ातील १७ जण उत्तराखंडमध्ये अडकले
रत्नागिरी जिल्ह्य़ाच्या विविध भागातून चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये गेलेले १७ जण तेथील महाप्रलयामुळे अडकले आहेत. पण सर्वजण सुखरूप असल्याची माहिती येथे आली आहे. मुसळधार पाऊस आणि महापुराने सध्या उत्तराखंडमध्ये धुमाकूळ घातला असून देशभरातील हजारो यात्रेकरू तेथे विविध ठिकाणी अडकले आहेत.
First published on: 21-06-2013 at 12:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 17 people of ratnagiri district got stuck in uttarakhand