अहिल्यानगर : शहरातील डॉ. प्रकाश कांकरिया यांच्या रुग्णालयाची तोडफोड करून त्यांना मारहाण केली व काळे फासल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील १७ आरोपींना प्रत्येकी एक वर्ष कैद व प्रत्येकी ११ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने दिली. सर्व आरोपी शहर व परिसरातील आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. सहारे यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियुक्त अर्जुन पवार व अतिरिक्त सरकारी वकील केदार केसकर यांनी काम पाहिले. खटल्यात एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. पैरवी अधिकारी सहायक उपनिरीक्षक विलास साठे यांनी सरकारी वकिलांना साहाय्य केले.

संजीव बबनराव भोर (रा. पाईपलाईन रस्ता, पंचवटीनगर, अहिल्यानगर), महादेव परशुराम भगत (कापूरवाडी, अहिल्यानगर), बलभीम परशुराम भगत (कापूरवाडी), बाबासाहेब बाबूराव झरे (इमामपूर, अहिल्यानगर), संतोष विठ्ठल वाडेकर (देसवडे, पारनेर), आदिनाथ शंकरराव काळे (वांजोळी, नेवासा), रमेश अशोक बाबर (बाबर मळा, बुरुडगाव रस्ता, अहिल्यानगर), किशोर सुनील आरडे (बोधेगाव, अहिल्यानगर), अरुण बाबासाहेब ससे (जेऊर, अहिल्यानगर), संदीप ऊर्फ मेजर शंकर पवार (एमआयडीसी, अहिल्यानगर), शरद ऊर्फ बाळू गदाधर (एमआयडीसी), कैलास शिवाजी पठारे (जेऊर, अहिल्यानगर), योगेश ऊर्फ भावड्या गोविंद आरडे (मल्हारनगर, एमआयडीसी) गणेश ऊर्फ भैया जितेंद्र शिंदे (एमआयडीसी), विठ्ठल रमेश गुडेकर (एमआयडीसी), बापू बाबासाहेब वीरकर (एमआयडीसी), सागर कडूबा घाणे (नवनागापूर, अहिल्यानगर) यांना शिक्षा देण्यात आली. शिक्षा ठोठावलेल्या एका आरोपीचे निधन झाले आहे.

फिर्यादी डॉ. प्रकाश कन्हैयालाल कांकरिया हे माणिक चौकात साई सूर्य नेत्रालय नावाचे रुग्णालय चालवतात. १८ डिसेंबर २०१८ रोजी त्यांच्याकडे महिला आली. शुल्कावरून वाद झाल्याने तिच्या पतीने रुग्णालयात घुसून मारहाण केली व सामानाची मोडतोड केली होती. त्याबाबत कांकरिया यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर महिलेच्या पतीने व तिने कांकरिया यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. महिलेचा पती तक्रार मिटवण्यासाठी कांकरिया यांच्याकडे ११ लाख रुपयांची मागणी करून धमकी देत होता.

त्यानंतर २४ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी २.३० च्या सुमारास महादेव परसराम भगत, बलभीम परसराम भगत व त्यांच्याबरोबर २० ते २५ जण कांकरिया रुग्णालयात आले. त्यामध्ये संजीव भोर, आदिनाथ काळे, बाबा जरे, सतीश वाडेकर व इतर अनोळखी होते. त्यांनी हातातील लाकडी दांडक्याने रुग्णालयाचे नुकसान केले. कांकरिया यांना रुग्णालयाबाहेर आणून त्यांच्या डोक्यावर एका डब्यातील काळ्या रंगाचे ऑइल ओतले. काही जणांनी ते त्यांच्या तोंडाला फासले.

कांकरिया यांना फरपटत माणिक चौक ते कापड बाजार असे घेऊन गेले. त्या वेळी काही जणांनी त्यांच्या गळ्यात चपलांचा हार व घाणेरडा मजकूर असलेला फलक अडकवला होता. काही वेळाने पोलिसांनी त्यांची सुटका केली. या घटनेबाबत कांकरिया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कोतवाली पोलिसांनी फिर्याद दाखल केली. वरील सर्व आरोपींना बदनामीसाठी धिंड काढणे, मानहानी करण्यासाठी हल्ला करणे, दुखापत करण्याच्या उद्देशाने बेकायदा प्रवेश करणे, बेकायदा जमाव करून दंगा करणे आदी कलमांन्वये शिक्षा दिली, तर इतर कलमांतून मुक्तता केली.