अकोला शहरातील गुडधी रेल्वे गेट परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी एका १७ वर्षीय मुलीनं रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. रविवारी आत्महत्येची ही घटना समोर आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
श्रृती नाजूकराव डांगे असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव असून ती अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातील रहिवासी होती. तिने वाढदिवसाच्या एक दिवस आधीच अशाप्रकारे जीवन संपवल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय श्रृती गुडधी रेल्वे गेटसमोर आपली दुचाकी उभी करून थेट रेल्वे रूळावर जाऊन उभी राहिली. काही क्षणात वेगाने येणाऱ्या रेल्वेनं दिला जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सिव्हील लाईन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप कळू शकले नाही. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.