मार्च महिन्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. ऐन उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. राज्यात विविध जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.
दरम्यान, विविध राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीकाच्या नुकसानीची पाहाणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी नाशिक जिल्ह्यात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहाणी केली होती. एकीकडे अवकाळी पाऊसामुळे शेतकरी वर्ग हवालदिल असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेल्याने शरद पवारांनी टीका केली होती.
हेही वाचा- अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून अहवाल सादर करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येवरून परतल्यानंतर आज (सोमवार) नाशिक जिल्ह्यात जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
यानंतर महाराष्ट्र सरकारने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १७७ कोटी रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना यातून आर्थिक मदत दिली जाणार आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.