महापालिका क्षेत्रात १८० अनधिकृत धार्मिक स्थळे आढळून आली असून ही निष्कासित करणे, स्थलांतर करणे अथवा नियमित करणेबाबत प्रशासनाने एक महिन्याच्या मुदतीत मते मागविली आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने ही माहिती संकलित केली असून यामध्ये काही धार्मिक स्थळे ही शासकीय जागेत असल्याचे आढळून आले आहे.
आयुक्त अजिज कारचे यांनी या अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी संकेतस्थळासह वृतपत्रीय निवेदनाद्बारे शनिवारी प्रसिध्द केली. यादीमध्ये सांगलीत ५३, मिरजेत ८७ आणि कुपवाडमध्ये १२ धार्मिक स्थळांचा समावेश आहे. शहराच्या विविध भागामध्ये ही स्थळे आहेतच, पण त्याचबरोबर महसूल विभाग आणि पंचायत समितीच्या आवारातही धार्मिक स्थळे अनधिकृत उभारण्यात आल्याचे तपासणीत आढळून आले आहे.
या धार्मिक स्थळांचे निष्कासन करणे, स्थलांतर करणे अथवा नियमित करणे याबाबत आपली मते महापालिकेकडे एक महिन्यात सादर करावीत असे निवेदनात म्हटले आहे.

Story img Loader