आतापर्यंत १८२ जहाल नक्षलवाद्यांना ठार केले
कल्लेडच्या जंगलात सात नक्षलवाद्यांना ठार करून नक्षलविरोधी अभियान राबविणारे ‘सी-६०पथक’ नक्षलवाद्यांसाठी कर्दनकाळ ठरल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या पथकाने आजवर १८२ जहाल नक्षलवाद्यांना ठार केलेआहे. इतकी भरीव कामगिरी करणारे राज्य पोलिस दलातील हे एकमेव पथक आहे. १ नोव्हेंबरला या पथकाच्या निर्मितीला २७ वष्रे पूर्ण झाली असून वर्षपूर्तीचा उत्सव यशस्वी कामगिरीने साजरा झाला आहे.
महाराष्ट्र, छत्तीसगड व तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमेवर कल्लेडचे घनदाट जंगल आहे. तिन्ही राज्यांत सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांना कल्लेडचे जंगल सर्व दृष्टीकोनातून सोईस्कर आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांचे शिबीर तेथे होणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. या मोहिमेवर हे पथक अनेक दिवसांपासून काम करीत होते. उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे व पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी या पथकाला अधिक सक्रिय केले. याच माहितीच्या आधारावर पथकाचे कमांडर सहायक उपनिरीक्षक मारोती मडावी यांनी नक्षल्यांना घेरण्याची व्यूहरचना तयार केली. विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार, उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे व पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या निर्देशानंतर कल्लेडच्या जंगलात नक्षल्यांना भल्या पहाटे गाठून सात जहाल नक्षलींना ठार करण्यात आले.
१९८० च्या दशकात महाराष्ट्र व तेव्हाच्या मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या गडचिरोली जिल्हय़ात नक्षलवाद्यांनी लगतच्या आंध्रप्रदेशातून प्रवेश केला. नक्षलवादी गडचिरोलीत आले आणि तेव्हापासून या जिल्हय़ात रक्तपात, हिंसाचार, हत्या, गोळीबार, अपहरण, खंडणी वसुली अशा घटनांमध्ये वाढ झाली. नक्षलवादी रात्री बेरात्री कधीही गावात येऊन आदिवासी व दलितांच्या हत्या करू लागले. कंत्राटदारापासून तर शिक्षकापर्यंत नक्षलवाद्यांनी कुणालाच सोडले नाही. पोलिस आणि वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी नक्षलवाद्यांच्या ‘हिट लिस्ट’वरच होते. त्यामुळे हत्यासत्र, भूसुरुंग स्फोटांच्या घटनांमध्ये वाढ झाली. हा नक्षली हिंसाचार वाढतच गेला. त्याला कुठेतरी रोखणे आवश्यक होते. नक्षली कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी राज्यकर्ते गांभीर्याने अभ्यास करीत असतानाच १ नोव्हेंबर १९९० मध्ये गडचिरोलीचे तत्कालीन पोलिस अधीक्षक के.पी.रघुवंशी यांनी सी-६० पथकाची स्थापना केली. तेव्हा सी-६० पथकामध्ये केवळ ६० सक्षम विशेष कमांडोंची नियुक्ती करण्यात आली व पोलिस निरीक्षक एस.व्ही.गुजर हे सी-६० चे पहिले प्रभारी अधिकारी होते. या सी-६० पथकातील कमांडोना घनदाट जंगलात नक्षलवाद्यांविरूध्द युद्ध करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर पथकाने कधीच मागे वळून बघितले नाही. दक्षिण भागात नक्षल कारवायांमध्ये वाढ झाल्याने प्राणहिता उपमुख्यालय मार्च १९९४ साली सी-६० च्या दुसऱ्या मुख्यालयाची स्थापना करण्यात आली. या पथकाला पूर्वी क्रॅक कमांडो या नावानेहीओळखले जात होते. प्रशिक्षित सी-६० पथकातील जवान कठोर परिश्रम घेऊन गडचिरोली जिल्हय़ाच्या कानाकोपऱ्यात जाऊन डोंगर, दऱ्या व अतिदुर्गम भागामध्ये नक्षलविरोधी अभियान राबवितात. तसेच नक्षल चळवळीत असणाऱ्यांच्या कुटुंबीयांना व नातेवाईकांना भेटून त्यांना आत्मसमर्पणासाठी प्रवृत्त करणे, विविध शासकीय सुविधा व योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करून त्यांचा लाभ घेण्यास त्यांचे मन परिवर्तन करून त्यांना लोकशाहीच्या विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यास प्रवृत्त करण्याचे कामही करतात. मात्र कट्टर नक्षलवादी शासकीय योजनेला व लोकशाहीला विरोध करून लोकांना शासना विरुद्ध भडकवतात. वीज, रस्ते, तलाव, कूपनलिका, आरोग्य, शाळा, बससेवेपासून तर सर्व प्रकारच्या कामात या पथकाची गावकऱ्यांना मदत होते.
सर्वात मोठे यश -शेलार
कल्लेडच्या जंगलात सात नक्षलवादी ठार करून सी-६० पथकाने आजवरचे सर्वात मोठे यश संपादन केले आहे अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपले अस्तित्व दाखविण्यासाठी नक्षलवादी सामान्य आदिवासी व दलित नागरिकांना पोलिस खबऱ्या असल्याचे घोषित करून त्यांची क्रूरपणे हत्या करतात. त्याला गडचिरोली पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘पीएलजीए’ सप्ताहात प्रथमच नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान नक्षलविरोधी अभियानामध्ये झाले आहे. यापूर्वी गोविंदगाव येथे २०१३ मध्ये एकाच वेळी सहा नक्षलवाद्यांना सी-६० पथकाने ठार केले होते. आतापर्यंत सी-६० कमांडोंच्या अभियानामध्ये बुधवारी कल्लेड येथे मिळालेले यश सर्वात मोठे आहे, असेही ते म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्र्यांकडून अभिनंदन
गडचिरोली पोलिस दलाने नक्षलवाद्यांविरुद्ध मोहीम राबवून सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याची वार्ता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळताच त्यांनी गडचिरोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे अभिनंदन केले. तसेच गृहमंत्री सिंग यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचेही अभिनंदन केले. गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व गडचिरोलीचे पालकमंत्री अंबरीश आत्राम यांनीही गडचिरोली पोलिस दलाच्या या कामगिरीची दखल घेत डॉ.देशमुख, त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी, सी-६० पथक व नक्षलविरोधी पथकाचे अभिनंदन केले.