अहिल्यानगर : भारत-पाकिस्तानच्या १९७१ मधील युद्धात बांगलादेश मुक्तीसाठी अतुलनीय शौर्य गाजवताना अहिल्यानगरचे सुपुत्र कॅप्टन विश्वनाथ वासुदेव तथा राजाभाऊ कुलकर्णी यांना वीरमरण आले. त्यांची वीरपत्नी रेवा कुलकर्णी यांना भारतीय लष्कराच्या ६७ मैदानी तोफखाना वीर मराठा रेजिमेंटतर्फे आज, सोमवारी सन्मानित करण्यात आले.
बांगलादेशचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची स्वाक्षरी असलेले कृतज्ञतापत्र आणि गौरवचिन्ह या वेळी प्रदान करण्यात आले. शहरातील गुलमोहर रस्त्यावरील रेवाताईंच्या निवासस्थानी रेजिमेंटचे प्रमुख कर्नल श्यामकिशोर द्विवेदी, निवृत्त मेजर जनरल एच. एस. बेदी, मेजर नीरज पवार, लेफ्टनंट निखिलकुमार, अधिकारी संतोष काळोखे, आर. सी. खेर्डे, कर्नल सी. संदीप आदींनी भेट दिली.
राजाभाऊंच्या रेजिमेंटमधील अधिकारी भेटीसाठी आलेले पाहून रेवा कुलकर्णी भावविवश झाल्या. रेजिमेंटचे सन्मानचिन्ह, कॅ. राजाभाऊंची प्रतिमा, या बटालियनचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, बांगलादेशाने पाठवलेले कृतज्ञता पत्र, गौरवचिन्ह, तसेच बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या भारतीय अधिकारी व जवानांची अधिकृत सूची आणि माहिती, बांगलादेशच्या राष्ट्रपिता शेख मुजिबुर रहमान यांनी लिहिलेले आत्मकथनपर पुस्तक रेवा कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आले.
वीर मराठा रेजिमेंटला बांगलादेशमधील शिरामणी येथील युद्धात कॅ. कुलकर्णी यांनी पाकिस्तानी सैन्याशी लढताना दाखविलेल्या अतुल्य शौर्यामुळे आजही शौर्य आणि समर्पणाची प्रेरणा मिळते, असे कर्नल द्विवेदी यांनी या वेळी नमूद केले. रेवाताईंनी रेजिमेंटसाठी ५१ हजारांचा धनादेश दिला. स्नेहालय संस्थेच्या वाटचालीवरील ‘अप अगेन्स्ट डार्कनेस’ हे मेधा देशमुखलिखित पुस्तक अधिकाऱ्यांना भेट देण्यात आले. सुषमा देवगावकर आणि डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी स्वागत केले. भूषण देशमुख, डॉ. वैशाली आणि डॉ. प्रभास पाटील, विनोद गुंडू आदी उपस्थित होते. १९६२च्या भारत-चीन युद्धानंतर स्थापन झालेल्या ६७ वीर मराठा रेजिमेंटमधील निवृत्त अधिकारी आणि सैनिकांचे महासंमेलन निमित्ताने देशभरातील अधिकारी आणि सैनिक नगरमध्ये एकत्र आले होते.
बिकानेरमध्ये पुतळा
६७ मैदानी तोफखाना वीर मराठा रेजिमेंटच्या बिकानेर (राजस्थान) येथील मुख्यालयात कॅप्टन राजाभाऊंचा पूर्णाकृती पुतळा नुकताच उभारण्यात आला आहे. त्या संबंधीचा माहितीपट या वेळी दाखवण्यात आला. यापूर्वी वीर मराठा रेजिमेंट फिरोजपूर (पंजाब) येथे असताना येथील लष्करी छावणीतील एका संकुलास शहीद कॅप्टन कुलकर्णी यांचे नाव देण्यात आले आहे.