लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे-करवडीकर लोकनाटय़ तमाशा कायम लोकप्रियतेच्या झोतात राहीला आहे. तमाशा सादरीकरणाचा सध्या हंगामा असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नारायणगावला भरलेल्या तमाम तमाशा मंडळांच्या बोलीमध्ये मंगला बनसोडे -करवडीकर तमाशा मंडळाला सर्वाधिक रकमेची सव्वादोन लाखाची सुपारी मिळाली आहे.
महाराष्ट्रातील गावकारभा-यांची नारायणगाव येथे जत्रा भरते. आपल्या गावातील तमाशाची सुपारी देण्यासाठी येथील राहुटय़ांमध्ये या गावपुढा-यांची वर्दळ राहते. यंदा सुमारे सव्वा दोनशे तमाशा कार्यक्रमांच्या सुपा-या घेतल्या गेल्या. साधारणपणे ही उलाढाल दोन कोटींच्या घरात राहिल्याचे सांगितले गेले.
यंदा फडमालकांना महागाई अन् दुष्काळाचा फटका बसला. तुलनेत यंदा धिमा प्रतिसाद मिळाला. प्रत्येक फडमालकाला किमान ४ ते ५ गावपुढा-यांची आवताण मिळाली आहेत. मंगला बनसोडे-करवडीकर तमाशा मंडळापाठोपाठ रघुवीर खेडकर, तुकाराम खेडकर, पांडुरंग मुळे, मालती इनामदार, अंजली राजे-नाशिककर, कुंदा पुणेकर, लता पुणेकर यांच्या सुपा-या या यंदाच्या हंगामातील प्रमुख दिवशी बक्कळ रकमेच्या सुपा-या देणा-या ठरल्या आहेत. तमाशाची लोककला जिवंत ठेवणा-या वरील तमाशा व लावणी कलावंतांनी अवघ्या ग्रामीण जीवनावर आपली पकड कायम ठेवली आहे. त्यामुळेच महागाई आणि दुष्काळाच्या छायेतही तमाशाच्या कार्यक्रमांना चांगली मागणी रहात असल्याचे तमाशा कलावंत मोठय़ा अभिमानाने सांगतात.

 

Story img Loader