जिल्ह्य़ातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था असून रस्त्याच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी २५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना खासदार चंद्रकांत खैरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्या. सुभेदारी विश्रामगृहावर मुख्य अभियंता सी. पी. जोशी, अधीक्षक अभियंता यू. के. आहेर, राष्ट्रीय महामार्गाचे चामरगोरे आदी यावेळी उपस्थित होते.
बीड वळणस्त्यावर संपादित करण्यात आलेल्या जमिनीवर अतिक्रमणे होत असून ती हटविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. महानुभव आश्रम ते सेंट फ्रान्सिस स्कूल या रस्त्याचा प्रश्न गंभीर असून पैठण रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत पॅचवर्क करून खड्डे बुजवावेत, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. बांधा-वापरा-हस्तांतरित करा, या तत्त्वावर पैठण रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल, असे सी. पी. जोशी यांनी सांगितले. मात्र तोपर्यंत तरी खड्डे बुजवा, असे कार्यकारी अभियंत्यास सांगण्यात आले. नगरनाका ते गोलवाडी रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून भुयारी मार्ग लवकरच पूर्ण होईल. रेल्वे विभागाशीही सकारात्मक बोलणी झाली असल्याचे जोशी यांनी सांगितले. राजूर-फुलंब्री हा २१ किलोमीटरचा रस्ता अत्यंत वाईट अवस्थेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पाच किलोमीटरचे काम मंजूर करण्यात आले आहे. मात्र उर्वरित रस्त्याच्या कामासाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव मंजूर करावा लागेल, असे जोशी म्हणाले.
दौलताबाद किल्ल्याजवळील दरवाजामुळे वाहतुकीची कोंडी होते. डोंगराच्या खालच्या बाजूने मार्ग काढता येईल काय, याची चाचपणी करावी, असे सूचविण्यात आले. संसद ग्राम योजनेसाठी निवडलेल्या आडगाव भोसले या कन्नड तालुक्यातील गावासाठी विशेष आराखडा तयार करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. पैठण येथील रस्त्याच्या गुणवत्तेकडे बारकाईने लक्ष द्यावे. लासूर स्टेशनवरील नदीवरील पुलाचे काम व जळगाव ते करजगाव फाटा ही कामेही तातडीने घ्यावीत, असे त्यांनी सूचविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा