जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. तर इतर तीन जण जखमी झाले आहेत. भारतीय लष्कराच्या जवानांनी धर्मसालच्या बाजीमाल परिसरात दोन दहशतवाद्यांना घेरलं आहे. त्यामुळे दोन्ही बाजुंनी अंदाधुंद गोळीबार केला जात आहे. यामध्ये दोन लष्करी अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत, याबाबतची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.
‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, मृतांमध्ये दोन कॅप्टन आणि दोन हवालदारांचा समावेश आहे. तर इतरही काही अधिकारी जखमी झाल्याचं वृत्त आहे. चकमकीत जखमी झालेल्यांना जवानांना उधमपूर येथील लष्कराच्या कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. संबंधितांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत अधिक माहिती देताना लष्कराच्या अधिकार्यांनी सांगितलं की, राजौरी जिल्ह्याच्या बाजीमालमध्ये अडकलेले दोन दहशतवादी हे परदेशी नागरिक असल्याचा संशय आहे. ते रविवारपासून बाजीमाल परिसरात फिरत होते. तसेच ते प्रार्थनास्थळांमध्ये आश्रय घेत होते.
हेही वाचा- भारतीय सुरक्षा दलाची जम्मू काश्मिरमध्ये मोठी कारवाई, ५ दहशतवाद्यांचा खात्मा
दरम्यान, स्थानिक रहिवाशांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला सांगितलं की, दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी रविवारपासून या भागात शोध मोहीम राबवली जात होती. या चकमकीमुळे गावकऱ्यांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मुलांना शाळेत पाठवू नये, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.