लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : परळीमध्ये शेतकर्याकडून २८ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या मिरजेतील घराच्या झाडाझडतीमध्ये लाच लुचपत विभागाने २ किलो सोन्यासह १ कोटी ६२ लाखाची संपत्ती जप्त करण्यात आली. बीड लाच लुचपत विभागाने बँक लॉकर सिल करून जप्त केलेला ऐवज परळी पोलीसांकडे जमा केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, चिंचोटी तलावातील गाळ माती काढून नेण्यासाठी आवश्यक परवाना देण्यासाठी पाटबंधारे विभागाचा कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांने ३५ हजाराची लाच मागितली होती. चर्चेअंती २८ हजार रूपये लाच घेत असताना लाच लुचपत विभागाच्या बीडमधील पथकाने त्याला रंगेहात अटक केली.
अटकेनंतर अपसंपदा बाबत माहिती घेत असताना सलगरकर हा मूळचा मिरजेतील असल्याची माहिती मिळाल्यानंतर लाच लुचपत विभागाच्या पथकाने कुपवाड रोडवरील त्याच्या निवासस्थानी चौकशी केली असता त्याचे युनियन बँकेमध्ये लॉकर असल्याची माहिती मिळाली. या लॉकरची झडती घेतली असता त्यामध्ये ११ लाख ८९ हजाराची रोकड, २ किलो १०५ ग्रॅम वजनाचे सोने, ज्यामध्ये १ किलो ११४ ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे आणि ९९१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा १ कोटी ६१ लाख ८९ हजाराचा ऐवज मिळाला. सांगलीच्या पथकाने परळी पोलीस ठाण्याकडे जप्त केलेला ऐवज वर्ग केला असल्याचे लाच लुचपत विभागाकडून सांगण्यात आले.