सातारा येथील एका उद्योगपतीचा मुलगा व त्यांच्याच कारखान्यात टेलिफोन ऑपरेटर म्हणून कामास असलेली महिला ऑर्थरसीट पॉइंटवरून बेपत्ता झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांना त्यांचा शोध न लागल्याने त्यांचा अपघात किंवा आत्महत्या केल्याची शंका व्यक्त होत आहे. दरम्यान उद्या पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
सातारा येथील उद्योगपती रामदास जोशी यांचे चिरंजीव अश्विन जोशी आणि त्यांच्याच कंपनीत ‘टेलिफोन ऑपरेटर’ म्हणून काम करणारी महिला वैशाली निशिकांत येवले काल महाबळेश्वर येथे आले होते. ऑर्थरसीट पॉईंटवर ते आल्यावर येथील वाहनतळावर त्यांनी आपली मोटार लावली व ते पॉईंट पाहण्यासाठी गेले. जाताना वैशाली हिने आपल्या चपला या पॉइर्ंटवरच्या दुकानात ठेवल्या होत्या. सायंकाळी सर्व पर्यटक गेल्यानंतर व दुकाने बंद झाल्यावरही ते परतले नाहीत. ज्या दुकानात त्यांनी चप्पल ठेवली होती त्या दुकान मालकानेही त्यांच्या चपला बाहेर  काठून ठेवल्या. सकाळी ती चप्पल तेथेच आढळून आल्यावर याबाबत पोलिसांना कळविण्यात आले.
पोलिसांना या दोघांनी लावलेली मोटारही बेवारस स्थितीत मिळाली. यानंतर पोलिसांनी गिर्यारोहक व स्थानिक नागरिकांच्या मदतीने या दोघांचा सायंकाळी उशीरापर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पाऊस व दाट धुक्यामुळे शोध मोहिमेत अनेक अडथळे येऊ लागल्याने ही मोहीम थांबविण्यात आली. उद्या पुन्हा ही शोध मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले.

Story img Loader