जिल्ह्य़ात नवनवे उद्योग यावेत, येथील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे व जिल्ह्य़ाचा सर्वागीण विकास व्हावा, यासाठी आपण प्रयत्नशील असून त्याचाच एक प्रमुख भाग म्हणून गुहागर तालुक्यातील मार्गताम्हाने येथे सुमारे दोन हजार एकर क्षेत्रात गारमेंट इन्डस्ट्रीज (वस्त्रोद्योग) उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री व काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी येथे केली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नीलेश राणे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन उद्योगमंत्री राणे यांच्या हस्ते झाले. ते पुढे म्हणाले, आपला मुलगा कर्तबगार व्हावा, असे सर्वच मातापित्यांना वाटते. माझ्या बाबतीतही हेच झाले आहे. यामुळे मी साहजिकच आनंदी असल्याचे सांगून खा. डॉ. नीलेश राणे यांचे त्यांनी कौतुक केले. या वेळी त्यांनी विरोधी पक्षाकडून होणाऱ्या टीकेचाही खरपूस समाचार घेतला. ज्यांना विकासाची दिशा नाही, विकास म्हणजे काय हे माहीत नाही, त्यांनी सत्तेवर येण्याच्या वल्गना करू नयेत. काँग्रेस पक्ष तसेच राणे कुटुंबीयांवर टीका करण्यातच ज्यांना स्वारस्य आहे, त्यांच्याकडून आणखी अपेक्षा ती कसली करणार? असा सवालही त्यांनी केला.
पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदाची चालून आलेली संधी त्यागून काँग्रेस हा त्यागाचा पक्ष असल्याचे दाखवून दिले आहे. जगात मंदीची लाट आलेली असताना त्यातून भारताला बचावून नेण्याची कामगिरी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञांनी केली आहे. मात्र विकास कशाशी खातात हे विरोधकांना ठाऊकच नसल्याने निव्वळ विरोध करण्याचा एककलमी कार्यक्रम ते राबवीत आहेत. अन्न सुरक्षा कायदा विधेयक संसदेत मंजूर झाले असते तर देशातील ६८ टक्के गरिबांना प्रति किलो ३ रुपये दराने तांदूळ व २ रुपये दराने गहू मिळाला असता. मात्र भाजप-शिवसेनेने संसदेचे कामकाज बंद पाडून त्याला खो घातला. जैतापूर प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी साडेबावीस लाख रुपये जमिनीच्या मोबदल्यापोटी देण्याचा निर्णयही काँग्रेस आघाडी सरकारचाच असल्याचे राणे यांनी सांगितले.
या वेळी खा. डॉ. नीलेश राणे यांनी आपल्या छोटय़ाशा खुमासदार भाषणात गेल्या चार वर्षांत मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेताना जिल्ह्य़ात ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता असली तरच विकास योजना यशस्वीपणे राबविणे शक्य असल्याचे सांगितले. काही ठिकाणी काँग्रेसची सत्ता नसल्यामुळे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खासदार निधी पोहोचूनही आणि प्रशासकीय मान्यता मिळूनही विकासकामे केली जात नाही, अशी खंत व्यक्त करून यासाठी कार्यकर्त्यांनी पेटून उठण्याची गरज आहे. एकटा नीलेश राणे किती पुरणार? असा सवाल त्यांनी केला आणि म्हणूनच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभेमध्येही काँग्रेसचेच लोकप्रतिनिधी असले पाहिजेत, असे ते म्हणाले.
शिवसेनेचे सुरेश प्रभू काँग्रेसमध्ये आले असते तर ते खासदार आणि मंत्रीही झाले असते आणि मी मात्र साधा आमदार झालो असतो. आता मी खासदार असेपर्यंत तरी सुरेश प्रभू कधी खासदारही होऊ शकणार नाही. राणेसाहेबांनी सिंधुदुर्गात खूप काही करून ठेवले आहे. सिंधुदुर्गने मलाही नाव दिले आहे, पण रत्नागिरीने मला काम करण्याची पद्धत शिकविली. लोकांना धरून ठेवणे किती जिकिरीचे असते ते मला समजले. काम करताना टीका होतच असते, पण बोलण्यापेक्षा काम करत राहणे यालाच मी महत्त्व देतो, असे ते म्हणाले.
या वेळी जिल्ह्य़ाच्या विविध भागांतील विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीररीत्या प्रवेश केला. या सर्वाचे उद्योगमंत्री नारायण राणे, खा. डॉ. राणे, जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी स्वागत केले.

Story img Loader