गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीपोटी तालुक्यातील शेतक-यांना आत्तापर्यंत २० कोटी ६७ लाख २१ हजार ६५० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. ८ कोटी ८९ लाख ४ हजार रुपयांचा तिसरा हप्ताही आला असून त्याचे वाटप सध्या सुरू आहे, अशी माहिती प्रभारी तहसीलदार कुलकर्णी यांनी दिली.
तालुक्यात सलग दोन वर्षे दुष्काळ पडला होता. या वेळी पाऊस चांगला पडला, त्यामुळे पिकांसह फळबागादेखील चांगल्या होत्या. त्यामुळे बळीराजा खुशीत असतानाच तालुक्यात काही दिवसांच्या अंतराने दोनदा जोरदार गारपीट झाली. त्यात शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. डाळिंब, द्राक्ष, कलिंगड, पपई, आंबा, चिकू आदी फळबागा उद्ध्वस्त झाल्या. डाळिंब तर तोडण्यास आला होता. याच टप्प्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. द्राक्षबागांचेदेखील प्रचंड नुकसान झाले.
केवळ फळबागाच नव्हेतर अन्य पिकांचेही गारपिटीने नुकसान झाले. हातातोंडाशी आलेली पिके यात नष्ट झाली. केंद्र व राज्य सरकारने आपद्ग्रस्त शेतक-यांना नुकसानभरपाई जाहीर केली व त्याचे वाटपही केले आहे. तालुक्यात आत्तापर्यंत दोन टप्प्यांमध्ये नुकसानभरपाईचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात २ हजार ३८७ शेतक-यांना १८ कोटी ४० लाख रुपये, दुस-या टप्यात २ हजार १०३ शेतक-यांना २ कोटी २७ लाख २१ हजार ६५० रुपये असे एकूण २० कोटी ६७ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. याशिवाय गेल्या वर्षीच्या रब्बी पिकांचे दुष्काळाने नुकसान झाले म्हणून शेती व फळबागांच्या अनुदानापोटी २२ कोटी ६९ लाख ९८ हजार ६५४ रुपये प्राप्त झाले आहेत, असे कुलकणी यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा