सोलापूर : जुनी पेन्शन लागू करण्यासाठी राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे सोलापुरात प्रशासकीय कामकाज ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिक्षण, आरोग्य, महसूल, कृषी आदी बहुतांशी सेवांवर संपाचा मोठा परिणाम झाला आहे. दुपारी सरकारी व निमसरकारी कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन एकजुटीचे प्रदर्शन घडविण्यात आले. या संपात शहर व जिल्ह्यातील सुमारे २० हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत.
हेही वाचा >>> सातारा : जुन्या पेन्शनसाठी साताऱ्यात साडेतेरा हजार सरकारी कर्मचारी संपावर
एरव्ही, सकाळपासूनच नागरिकांच्या वर्दळीने गजबणा-या शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी संपामुळे शुकशुकाट दिसून आला. कार्यालयात मोजक्या कर्मचाऱ्यांचा अपवाद वगळता ९० टक्क्यापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती होती. रोजंदारी, खासगी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचूया मदतीने अधिका-यांकडून कसेबसे कामकाज पाहिले जात होते. सोलापूर महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महावितरण कंपनी, छत्रपती शिवाजी सर्वोपचार शासकीय रूग्णालय, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विविध शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, ग्रामीण भागातील सरकारी रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम दिसून आला.
हेही वाचा >>> राज्यात बहुतांश ठिकाणी जनसुविधा सेवा कोलमडण्यास सुरुवात
सोलापूर महापालिकेत एकूण पाच हजार ४२१ कर्मचाऱ्यांपैकी २९५६ कर्मचारी सेवेत होते. तेथील आरोग्य विभागाची यंत्रणाही कोलमडली होती. राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन योजनेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रे व विविध रूग्णालयांमध्ये संपाचा परिणाम टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात परिचारिकांसह सुमारे ११०० कर्मचारी कार्यरत आहेत. तर डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ३१७ एवडी आहे. दोन्ही ठिकाणी मिळून पहिल्या पाळीत एकूण ५४९ पैकी अवघे सात कर्मचारी सेवेत रूजू होते. उर्वरीत सर्व कर्मचारी संपात उतरले होते. रूग्णालयात परिचारिका संघटनेच्या नेत्या रूथ कलबंडी यांच्या नेतृत्व ठिय्या आंदोलन झाले. रूग्णालयात रूग्णांवरील दैनंदिन छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात सुमारे ११०० कर्मचारी संपात उतरले आहेत. कृषी, सहकार, नगर भूमापन, भूजल सर्वेक्षण, वन विभाग, न्यायालय, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक व शहर पोलीस आयुक्तालयातील प्रशासकीय कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.